संगमनेर फेस्टीवलला प्रारंभ
By Admin | Updated: September 20, 2015 00:49 IST2015-09-20T00:40:28+5:302015-09-20T00:49:18+5:30
संगमनेर : मोठ्या घटना घडून-घडून सणावळी तयार होते. आधीच्या व नंतरच्या सणावळीत इतिहास असतो. दुर्दैवाने ते शिकविण्याची प्रथाच आपल्याकडे नाही.

संगमनेर फेस्टीवलला प्रारंभ
संगमनेर : मोठ्या घटना घडून-घडून सणावळी तयार होते. आधीच्या व नंतरच्या सणावळीत इतिहास असतो. दुर्दैवाने ते शिकविण्याची प्रथाच आपल्याकडे नाही. शाळांमध्ये शिकविला जाणारा इतिहास म्हणजे फक्त सणावळ्या पाठ करण्यापर्यंतच मर्यादीत असतो, असे मत सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित ‘संगमनेर फेस्टीवल’चे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी सोलापूरकर यांच्या हस्ते मालपाणी लॉन्सवर झाले. ‘प्रतापगडाचे मंत्रयुध्द’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यापीठावर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष किशोर पवार, राजेश मालपाणी, डॉ. संजय मालपाणी, सचिन पलोड, मनिष मणियार यांची उपस्थिती होती. ऐतिहासिक विभूती व त्यांचा खरा इतिहास आपल्यापर्यंत पोहचतच नसल्याची खंत सोलापूरकर यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, स्वत्वाचा कणा असलेल्या छत्रपती शिवरायांचा शाळेत शिकविला जाणारा इतिहास घटनात्मकच आहे. अफझलखानाचा वध, आगऱ्याहून सुटका, तानाजीने सिंहगड घेतला, बाजीप्रभूने घोडखिंड अडविली, इथपर्यंतच हा इतिहास अडकून राहतो. शत्रूची मानसिकता ओळखायची आणि त्याला खेचत आपल्या टप्प्यात आणायचे, तोपर्यंत शस्त्र उचलायचे नाही. शेवटच्या क्षणी शस्त्र हातात घेऊन शत्रूचा नि:पात करायचा. अशी एक नवीन युध्दनिती शिवरायांनी निर्माण केली. ती आपल्याला माहीतच नाही. आजही पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळात शिवरायांची ६ हजारांहून अधिक पत्रे वाचायची बाकी असल्याचे सोलापूरकर यांनी सांगितले.
अडीच तासाच्या व्याख्यानात सोलापूरकर यांनी शिवरायांच्या युध्दनितीचे विविध पैलू उलगडून दाखविले. प्रास्ताविकात मनिष मालपाणी यांनी फेस्टीवलच्या आयोजनाची माहिती दिली. मालपाणी व तांबे यांची मनोगते झाली.
मालपाणी उद्योग समूह व डान्स स्टुडिओतील कलाकारांच्या स्वागत नृत्याने प्रेक्षकांची दाद मिळविली. सूत्रसंचालन रमेश घोलप यांनी करून सतीश लाहोटी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)