शिवजयंती सोहळ्यास जल्लोषात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 13:16 IST2018-03-04T13:07:28+5:302018-03-04T13:16:38+5:30
शहरासह जिल्ह्यात शिवजयंती सोहळ्याला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला. शहरातील चौकाचौकात विविध मंडळांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंती सोहळ्यास जल्लोषात प्रारंभ
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात शिवजयंती सोहळ्याला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला. शहरातील चौकाचौकात विविध मंडळांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील चौपाटी कारंजा, दिल्ली गेट, चितळे रोड, प्रोफेसर चौक, सिव्हील हडको, बालिकाश्रम रोड, एकविरा चौक, पटवर्धन चौक, भिस्तबाग चौक आदी ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यात आले. शहरातून सकाळी युवकांनी हातात भगवे झेंडे घेऊन मोटारसायकल रॅली काढली होती. जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी शहर दुमदुमून गेले आहे.
सायंकाळी शिवसेनेच्यावतीने भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता माळीवाडा बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांचा विराजमान झालेला पुतळा, पुढे सनई चौघडे, घोडेस्वार, मावळ्यांच्या वेशातील शिवप्रेमी, विविध बॅण्ड पथक असे या मिरवणुकीचे स्वरूप राहणार आहे.
मिरवणुकीसाठी जय्यत तयारी
तिथीप्रमाणे रविवारी साजरी होत असलेल्या शिवजयंतीची शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेच्यावतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत विविध संघटना सहभागी होणार आहेत. दुपारी तीन वाजता माळीवाडा बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांचा विराजमान झालेला पुतळा, पुढे सनई चौघडे, घोडेस्वार, मावळ्यांच्या वेशातील शिवप्रेमी, विविध बॅण्ड पथक असे या मिरवणुकीचे स्वरूप राहणार आहे. माळीवाडा, आशा टॉकिज चौक, माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट ते चौपाटी कारंजा असा मिरवणुकीचा मार्ग राहणार आहे. हा मिरवणूक सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी शहरात चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.