स्टार प्रचारक गाजवणार मैदान
By Admin | Updated: September 27, 2014 00:15 IST2014-09-27T00:05:41+5:302014-09-27T00:15:25+5:30
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस बाकी असतांना युती-आघाडीचा घटस्फोट झाला. यामुळे ऐनवेळी सर्व पक्षांची तुल्यबळ उमेदवारासाठी शोधाशोध सुरू झाली.

स्टार प्रचारक गाजवणार मैदान
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस बाकी असतांना युती-आघाडीचा घटस्फोट झाला. यामुळे ऐनवेळी सर्व पक्षांची तुल्यबळ उमेदवारासाठी शोधाशोध सुरू झाली. दुसरीकडे पक्षातून डावलेले गेलेले उमेदवार विरोधी पक्षाच्या वाटेवर आहेत. १ आॅक्टोबर माघारीचा दिवस असून प्रचाराचा कालावधी तोकडा पडणार आहे. यासाठी सर्वच पक्षाकडून स्टार प्रचारकांचा आधार घेण्यात येणार असून मतदारांची मात्र चांगलीच राजकीय करमणूक होणार आहे.
यंदा विधानसभा निवडणुकीत दररोज नाट्यपूर्ण घटना आणि घडामोडी घडतांना दिसत आहे. आधी आघाडी आणि महायुती संयुक्तपणे लढणार असल्याचे चित्र होते. मात्र, गुरूवारी चारही पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. यासह मनसे आणि अन्य कम्युनिस्ट पार्टी, भारिप बहुजन, लालनिशाण, लोकशासन यासह अन्य लहानमोठ्या पक्षांनी संयुक्त आघाडी केलेली आहे. पाच प्रमुख पक्षांसह अन्य लहानमोठ्या आघाड्या सोबत अपक्ष म्हणजे प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची चांगलीच गर्दी होणार आहे.
आपल्या पक्षाचे ध्येय धोरण मतदारांपर्यंत पोहचविण्यास सर्वच पक्षांना कालावधी कमी पडणार आहे. प्रत्येक मतदारसंघाची व्याप्ती आणि निवडणुकीत उमेदवारांची वाढलेली संख्या यामुळे कार्यकर्त्यांचा तुटवडा भासणार आहे. यामुळे प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी आणि सभेत जास्त गर्दी जमवण्यासाठी स्टार प्रचारकांची आवश्यकता भासणार आहे. १ आॅक्टोबर अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर खऱ्याअर्थाने निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य मतदारसंघात चार प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने रंगत वाढणार आहे.
प्रचारासाठी अवघा १४ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. यात शेवटचे दोन दिवस जाहीर प्रचार थांबणार असून अवघ्या ११ दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. स्टार प्रचारक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणार असून त्यामुळे नगरकरांची चांगलीच राजकीय करमणूक होणार आहे. (प्रतिनिधी)