‘स्टॅण्डिंग’मुळे ऊठ‘बस’
By Admin | Updated: June 19, 2014 00:10 IST2014-06-18T23:40:45+5:302014-06-19T00:10:51+5:30
अहमदनगर: प्रसन्ना पर्पल अभिकर्ता संस्थेने बुधवारपासून शहर बससेवा बंद केली. या निर्णयाने दिवसभरात शहरातील पाच हजार प्रवाशांचे हाल झाले.
‘स्टॅण्डिंग’मुळे ऊठ‘बस’
अहमदनगर: प्रसन्ना पर्पल अभिकर्ता संस्थेने बुधवारपासून शहर बससेवा बंद केली. या निर्णयाने दिवसभरात शहरातील पाच हजार प्रवाशांचे हाल झाले. प्रवासी, विद्यार्थी रस्त्यावर ताटकळत उभे असल्याचे चित्र ठिकठिकाणच्या रस्त्यावर दिसत होते. स्थायी समितीच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत अभिकर्ता संस्थेने सेवा बंद करून बसेसही शहराबाहेर हलविल्या.
गत तीन वर्षापासून शहरात प्रसन्न पर्पल मोबालिटी ही अभिकर्ता संस्था शहर बससेवा चालवित आहे. संस्थेला आतापर्यंत दोन कोटी रुपयांचा तोटा झाला. तोट्यातील नुकसान भरपाई देण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविली आहे. स्थायी समितीने तसा निर्णय घेतला. त्यामुळे तोटा सहन करून सेवा देणे शक्य नसल्याचे सांगत संस्थेच्या संचालक मंडळाने बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. बससेवा बंद करू नये असे पत्र मंगळवारीच महापालिकेने संस्थेला दिले.
शहरात २३ बसेस सुरू होत्या या बसेसमधून सुटीच्या काळात दररोज पाच हजार प्रवासी प्रवास करायचे. अन्य काळात प्रवासी संख्या १५ हजाराच्या आसपास असायची. बससेवा बंद झाल्याने शहर बससेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. प्रवासी व विद्यार्थ्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागला. पर्याय नसल्याने रिक्षाचालकांच्या अरेरावीला प्रवाशांना सामोरे जावे लागले. शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचेही हाल झाले. शाळा, कॉलेजबाहेर विद्यार्थी ताटकळत उभे होते. (प्रतिनिधी)
महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी हे रजेवर आहेत. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय घेऊनही प्रशासनाच्यावतीने कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. बससेवा बंद करत असल्याचे पत्र मनपा प्रशासनाला मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.