एसटी सुरू मात्र खबरदारी घेताय ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:43+5:302021-06-09T04:25:43+5:30
अहमदनगर : मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटी बस अखेर रस्त्यावर धावू लागली आहे. नगर जिल्ह्यात एकूण ७०० बस ...

एसटी सुरू मात्र खबरदारी घेताय ना
अहमदनगर : मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटी बस अखेर रस्त्यावर धावू लागली आहे. नगर जिल्ह्यात एकूण ७०० बस असून त्यापैकी १६० बस पहिल्या दिवशी धावल्या. एसटी बस सुरू झाली असली तरी प्रवाशांनी कोरोनासंदर्भात खबरदारी बाळगावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटी सोमवारपासून पुन्हा धावू लागली असून प्रवाशांचा प्रतिसादही मिळत आहे. मात्र, अनेक प्रवासी जणू कोरोना संपलाय, अशा आविर्भावात प्रवास करताना आढळत आहेत. कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एकूण अकरा आगारात ७०० बस आहेत. त्यापैकी १६० बस पहिल्या दिवशी जिल्हा, तसेच जिल्ह्याबाहेर धावल्या. शंभर टक्के आसन क्षमतेने प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना देण्यात आली आहे. आता बस सुरू झाल्या असल्या तरी मोजक्याच फेऱ्या होत आहेत. आगारातून बस बाहेर पडते त्यावेळी ती सॅनिटाइज केली जात आहे, तसेच प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाही. सामाजिक अंतर राखले जात आहे. वेळोवेळी बस सॅनिटाइज केली जात आहे. मात्र, तरीही प्रवाशांनी सॅनिटायझर जवळ बाळगणे व त्याचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले तरच कोरोनाला अटकाव घालता येऊ शकतो. मात्र, प्रवास करत असताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाले तर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढून बस फेऱ्या बंद करण्याची वेळ येऊ शकते. आगाराकडूनही वेळोवेळी सॅनिटायझेशन केले जात आहे, तसेच प्रवाशांनीही काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत चालक, वाहकही प्रवाशांचे प्रबोधन करत आहेत.
-------------
सर्वाधिक वाहतूक पुणे मार्गावर
सोमवारपासून नगर जिल्ह्यात बस सुरू झाल्या. गेले दोन महिने जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही बस बंद होत्या. बस सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पुणे मार्गावर सर्वाधिक बस धावल्या. त्यानंतर नाशिक, मुंबई, गेवराई अशा ठिकाणी बस पाठवण्यात आल्या होत्या.
---------------
बस होते वेळोवेळी सॅनिटाइज
आता बस सुरू झाल्या असल्या तरी कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळले जात आहेत. आगारातून बस बाहेर पडते त्यावेळी सॅनिटाइज करण्यात येत आहे, तसेच बस परत आल्यानंतरही सॅनिटाइज करत असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून मिळाली.
दोन महिन्यांत ४२ कोटींचा तोटा
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एसटी महामंडळ मोठ्या अडचणीत सापडले आहे. मागील दोन महिने बस फेऱ्या बंद असल्यामुळे नगर जिल्ह्यात ११ आगारांचे मिळून तब्बल ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढतोय
काही बस फेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद अजून हवा तेवढा नाही. गर्दी नको म्हणून अनेक लोक एसटीने प्रवास करणे टाळत आहेत. परिस्थिती पाहून हळूहळू प्रवाशांची संख्या वाढत आहे.
बस सुरू झाली अन् जिवात जीव आला
गेल्या दोन महिन्यांपासून बस बंद असल्याने चालकही कंटाळवाणे झाले होते; परंतु आता बस सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून महामंडळाचा तोटा काहीअंशी का होईना भरून निघेल.
- चालक, तारकपूर आगार
बस पुन्हा सुरू झाली असली तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. आम्ही त्याबाबत त्यांना प्रवृत्त करत आहोत. कोणत्याही प्रवाशाला विनामास्क बसमध्ये घेतले जात नाही.
- वाहक, श्रीरामपूर आगार
----------
एकूण कर्मचारी - ४०००
वाहक - १३०८
चालक - १२६७
सध्या कामावर वाहक - १५०
सध्या कामावर चालक - २००