एस.टी.महामंडळाचे पाणी तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 23:40 IST2016-05-24T23:31:23+5:302016-05-24T23:40:44+5:30
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पाणीपट्टीची असलेली ३८ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने महामंडळाचा पाणी पुरवठा तोडला आहे.

एस.टी.महामंडळाचे पाणी तोडले
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पाणीपट्टीची असलेली ३८ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने महामंडळाचा पाणी पुरवठा तोडला आहे. पाणी पुरवठा तोडल्याने महामंडळाच्या स्थानकात तसेच कार्यशाळा व निवासस्थानांनाही पाणी मिळू शकले नाही. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी तातडीने महापालिकेत धाव घेत सवलत मागितली आहे. तोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाने ती फेटाळून लावली.
महापालिका स्थापन झाल्यानंतर महामंडळाला औद्योगिक दराने पाणीपट्टी आकारण्यात आली. ५० रुपये प्रतिहजार लीटर असा दर महापालिका महामंडळाकडून आकारत होती. २००६ पर्यंत महापालिकेने महामंडळास नियमित पाणीपट्टी कराची मागणी केली. मात्र महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. २००६ मध्ये औद्योगिक दराने पाणीपट्टी आकारल्याची तक्रार महामंडळाने महापालिकेकडे केली. त्यानंतर दुरूस्ती करत वाणिज्य वापराच्या दराने पाणीपट्टी आकारण्यात आली. तरीही महामंडळाने महापालिकेला पाणीपटट्ी भरली नाही. आतापर्यंत ३८ लाख रुपयांची थकबाकी महामंडळाकडे झाली. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेने वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्याच भाग म्हणून महामंडळाचा पाणीजोड महापालिकेने तोडला. मंगळवारी महामंडळाचे अधिकारी महापालिकेत आले. ३८ लाख रुपये थकबाकीत सुमारे १४ लाख रुपये दंड आहे. तो माफ करावा अशी मागणी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र तो महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा दोष आहे. नियमित पाणीपट्टी न भरल्यामुळे ही दंड आकारणी करण्यात आली. त्यामुळे त्यात सवलत मिळणार नाही अशी भूमिका उपायुक्त अजय चारठाणकर यांनी घेतली. अगोदर थकबाकी भरा मगच पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुनावण्यात आले.