सहा एकरवर उभारणार क्रीडा संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:04+5:302021-09-07T04:26:04+5:30
आमदार कानडे यांनी तहसीलदार प्रशांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नितीन गुजरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश बंड, पोलीस निरीक्षक संजय ...

सहा एकरवर उभारणार क्रीडा संकुल
आमदार कानडे यांनी तहसीलदार प्रशांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नितीन गुजरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश बंड, पोलीस निरीक्षक संजय सानप, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, तालुका क्रीडा सचिव नितीन बलराज, शिक्षक जाकीर सय्यद, तसेच क्रीडा समितीच्या सदस्यांसह जागेची पाहणी केली. समिती सदस्यांच्या सूचनाही यावेळी जाणून घेण्यात आल्या.
जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुले उभी राहिली आहेत. मात्र श्रीरामपूरला अद्यापही क्रीडा संकुल मंजूर होऊ शकलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा एकर जागेवर प्रशस्त असे संकुल उभे केले जाणार आहे. शेजारीच असणाऱ्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी तसेच तालुक्यातील युवा प्रतिभावान खेळाडूंना त्यामुळे दर्जेदार मैदान उपलब्ध होईल.
ग्रामीण भागातील तरुणांना नियमित व्यायाम तसेच पोलीस व लष्करातील भरतीकरिता मैदान नाही. त्यामुळे त्यांची अडचण होत आहे. शहरातील महाविद्यालयांच्या मैदानांवर त्यांना सरावाला जावे लागते. तेथेही अनेकदा परवानगी नाकारली जाते. ही अडचण दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे आमदार कानडे यांनी सांगितले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करावयाचे आहे. त्याकरिता भरीव निधी देण्याची ग्वाही मंत्री थोरात यांनी दिली आहे. वास्तूविशारदांकडून क्रीडा संकुलाचे डिझाईन तयार करण्यात येईल. चारशे मीटर ट्रॅक उभारण्यात येईल. खेळाडूंना सर्व आधुनिक सुविधा तेथे प्रदान केल्या जातील. त्याचबरोबर खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था करून त्यांना पूर्ण वेळ प्रशिक्षक देण्याचा प्रयत्न भविष्यात राहील. येवला येथे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या कल्पकतेतून दर्जेदार असे तालुका क्रीडा संकुल साकारले गेले. त्याची आपण प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्याच स्वरुपाचे संकुल उभारण्याचा प्रयत्न आहे, असे कानडे म्हणाले.
-----------