हेल्दी बेबी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: October 2, 2016 00:48 IST2016-10-02T00:28:20+5:302016-10-02T00:48:37+5:30
शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात गुरुवारी आयोजित हेल्दी बेबी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हेल्दी बेबी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर : जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, लोकमत व अहमदनगर अॅकॅडमी आॅफ पेडीयाट्रीक्स यांच्या संयुक्त विद्यमाने व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे फौंडेशनच्या सहकार्याने शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात गुरुवारी आयोजित हेल्दी बेबी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्ज्वलनाने झाली. यावेळी अहमदनगर अॅकॅडमी आॅफ पेडियाट्रीक्सचे अध्यक्ष डॉ.दिलीप बागल, सचिव जयदिप देशमुख, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.सुचित तांबोळी, डॉ.संदिप गायकवाड, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनचे मनोज शिरसाठ, प्रविण शेगर, सुहास अर्दाळकर तसेच पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेमोरीयल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या डॉ.प्राजक्ता घाटगे, डॉ.संपत्ती नेरकर, डॉ.अंजली दामिसेट्टी यांची उपस्थिती होती.
सदृढ, निरोगी बाळ प्रत्येक माता-पित्याचे स्वप्न असते. चांगली व सदृढ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृद्ध भारत अशा टप्प्याटप्प्याने विकसीत होणारी आपली संस्कृती आणि त्यात बदल घडविणे ही मोठी जबाबदारी जॉन्सन अॅण्ड जॉन्सस या भारतातील सर्वाधिक मातांचा लाडका बॅन्ड आणि आपली सामाजिक बांधिलकी जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे ‘लोकमत’ यांनी या दृष्टीने हेपाऊल उचलून या कॅम्पचे आयोजन केले होते.
यावेळी डॉ.दिलीप बागल यांनी ‘मुलांचा आहार’ या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले. डॉ.सुचित तांबोळी यांनी ‘मुलांची शारीरिक व मानसिक वाढ आणि पालकांची भूमिका’ यावर तर डॉ.संदिप गायकवाड यांनी ‘लसीकरणाचे महत्त्व’ या विषयांवर पालकांना मार्गदर्शन केले.
या मोफत कॅम्पमध्ये अनेक बालकांची तपासणी करण्यात आली. प्रत्येक पालकांना त्यांच्या बाळाच्या आरोग्याबद्दल योग्य सल्ला देण्यात आला.
प्रत्येक सहभागी बालकास प्रमाणपत्र, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन तर्फे हेल्थ किटची भेट देण्यात आली. तसेच फॅमिली फोटो फ्रेम देण्यात आली. उपस्थित सहभागींना लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे देण्यात आली.
बालकांना खेळण्यासाठी विशेष किड्स झोनची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी प्रसिद्ध चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळे व श्रीपाद गार्डन प्ले इक्वीपमेंट यांचे सहकार्य लाभले.
(प्रतिनिधी)
गर्भधारणेपासूनच बाळाचा आहार सुरू होतो. आईचे दूध हाच बाळाचा पहिला सर्वोत्तम आहार आहे. त्यामुळे पहिली दोन वर्षे हे दूध देणे आवश्यक आहे. बाळाच्या आहारावर त्याचा बुद्ध्यांक अवलंबून असतो. त्यामुळे आहाराबाबत पालकांनी सतर्क असणे आवश्यक आहे. घरामध्ये एक फुड कॉर्नर असावा. त्यामध्ये फुटाणे, दाणे, चिक्की असे पदार्थ असावेत. जेणेकरून मुले येता जाता ते पदार्थ खातील व त्यांचे वजन वाढण्यास उपयुक्त ठरेल.
-डॉ.दिलीप बागल
दुधाची बाटली ही बाळाची शत्रू असते. त्यामुळे मुले आजारी पडण्याची शक्यता असते. बालरोग तज्ज्ञ संघटनेने सांगितल्याप्रमाणे बाळाचे लसीकरण होणे आवश्यक आहे. बाळ २ महिन्याचे असताना आईकडे बघून हसणे, ४ महिन्यांचे असताना मान धरणे, ८ व्या महिन्याला स्वत:हून उठून बसणे, १ वर्षानंतर उभे राहणे, थोडं चालणे, बोललेलं समजणे आणि थोडं बोलणे यापद्धतीने बाळाची शारीरिक वाढ होतेय का याची पालकांनी काळजी घ्यायला हवी. मुलांना ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शाळेत टाकणे. प्रत्येक मुलाची बुद्धीमत्ता ही वेगवेगळ्या क्षेत्रात असते त्यामुळे त्यांची रूची पाहून त्यांना विकसीत करायला हवे. शारीरिक सोबत माणसिक लसीकरण ही तितकेच महत्त्वाचे आहे. पालकांनी जर मुलांना काही गोष्टींची समज दिली त्यांना भावनिकरित्या स्थिर केले तर बालकांच्या भविष्यातील वर्तन समस्या उद्भवत नाही.
-डॉ.सुचित तांबोळी
बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आहार, व्यायाम तसेच लसीकरण तितकेच महत्त्वाचे आहे. बाळाच्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. विविध आजारांच्या लसीकरणामुळे जे आजार परदेशात दिसत दिसत नाही असे आजार नष्ट होईल. यामध्ये पोलिओ प्रतिबंधक, जुलाब प्रतिबंधक, न्युमोनिया प्रतिबंधक, मेंदूज्वर प्रतिबंधक, कावीळ प्रतिबंधक, टायफाईड प्रतिबंधक, स्त्रियांच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोग प्रतिबंधक (सरव्हाईक कॅन्सर प्रतिबंधक) स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधक इ. लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.
-डॉ.संदिप गायकवाड.