अध्यात्म/मुक्ती फक्त ज्ञानानेच मिळते / अशोकानंद महाराज कर्डिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:30 IST2020-10-06T12:30:03+5:302020-10-06T12:30:34+5:30
जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत अंधार जाऊ शकत नाही. तुम्ही कोणतेही कर्म करा काहीही उपयोग होत नाही. शेकडो जन्म जरी गेले आणि आत्मज्ञान झाले नाही तर मुक्त होऊ शकत नाही.

अध्यात्म/मुक्ती फक्त ज्ञानानेच मिळते / अशोकानंद महाराज कर्डिले
भज गोविन्दम -१७
कुरुते गंगासागरगमनं व्रतपरिपालनमथवा दानम्।
ज्ञानविहिन:सर्वमतेन मुक्ति: न भवति जन्मशतेने-...
—————————-
सब तीर्थ बार बार, गंगासागर एक बार, अशी म्हण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. पण आता तसे नाही रहिले. सब तीर्थ बार बार और गंगासागर भी बार बार. कारण पूर्वी गंगासागर येथील कपिल मुनींचे मंदिर समुद्रात होते. आता ते मंदिर खूप अलीकडे आणले आहे. जेथे गंगा समुद्राला मिळते त्या तीर्थाला गंगासागर म्हणतात. या गंगासागराहुन जवळच बांगलादेश आहे आणि तेथून सर्रास तस्करी होत असते. किंबहुना येथे बरेचसे लोक हे बंगला देशीच आहेत. अवैध रित्या घुसलेले आहेत. त्यांच्यावर कोणाचाही कंट्रोल नाही. आम्ही त्यांची अरेरावी अनुभवली आहे. असो.
आदि शंकराचार्य स्वामी महाराज सांगतात, तुम्ही गंगासागरला गेलात तरीही मुक्त होऊ शकणार नाही. कारण मुक्ती फक्त आणि फक्त ज्ञानानेच मिळते. इतर कोणत्याही साधनाने मोक्ष मिळत नाही. हा श्रुतीचा सिद्धांत आहे व ज्ञानापेक्षा या जगात काहीही पवित्र नाही, असे भगवत गीता सांगते.
‘न हि ज्ञानेनसदृश्यं पवित्रमिह विद्यते. श्रुती माउली पण सांगते ऋतेज्ञानात न मुक्ति: ज्ञानादेव कैवल्यम्’ ज्ञानाशिवाय इतर कोणत्याही साधनाने मुक्ती नाही. फक्त ज्ञानानेच मुक्ती मिळते. हा अबाधित सिद्धांत आहे.
ज्ञानेश्वरीमध्ये फार छान संगितले आहे, ज्ञानेश्वरी अध्याय १२ मध्ये माउली म्हणतात,
‘मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर । परी वेचावें लागें शरीर । तिये गांवीं ॥ १७३ ॥हिमवंतु दोष खाये । परी जीविताची हानि होये । तैसें शुचित्व नोहे । सज्जनाचें ॥ १७४ ॥ शुचित्वें शुचि गांग होये । आणि पापतापही जाये ।परी तेथें आहे । बुडणें एक ॥ १७५ ॥ खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे । रोकडाचि लाहिजे। न मरतां मोक्षु ॥१७६॥
अनेक प्रकारचे तीर्थ आहेत. सप्त पुरी, चार धाम, बारा ज्योतिर्लिंग हे सर्व जरी तुम्ही फिरून आलात तरीही जर आत्मज्ञान झाले नाही तर काहीही उपयोग नाही. हेमाडपंडिताने काही हजारवर व्रते सांगितली आहेत आणि हे व्रते जर करायचे म्हटले तर आयुष्य पुरणार नाही.
—-
नलगे तीर्थीचे भ्रमण। नलगे दंडन मुंडण। नलगे पंचांगी साधना। तुम्ही आठवा मधुसूदना गा...।।श्री संत एकनाथ महराज ‘वासुदेव’ या अभंगात सांगतात की, तीर्थ भ्रमण, दंडण मुंडण, पंचाग्नी साधन हे काहीही मुक्तीसाठी आवशक नाही. किंवा लेने को हरिनाम है, देने को अन्नदान। तरने को है दीनता डूबने अभिमान,असे म्हणतात.
दानाचे प्रकार
अन्नदान,गोदान,भूदान,कांचनदान वस्त्रदान रक्तदान, गजदानआणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानदान. या वेगवेगळ्या प्रकारच्या दानाने फारतर पुण्य उत्पन्न होईल पण मुक्ती मिळणार नाही. कारण मुक्ती फक्त ज्ञानाने मिळते. ब्रह्म्स्वरुपाच्या अज्ञानामुळेच जगतभ्रम होत असतो. तो भ्रम त्याच्याच ज्ञानाने जात असतो. दुसºया कशानेही जात नाही. उदा. रज्जूच्या अज्ञानाने सर्प भ्रम होतो व त्याच रज्जूच्या ज्ञानाने सर्प भ्रम जातो. ज्ञानेश्वरीमध्ये माउली म्हणतात,स्वप्नीच्या घायो ओखद(औषध) चेववी धनंजयो तेवी अज्ञान ययाज्ञानची खड्ग स्वपांतील दुखाला जागे करणे हे औषध आहे.
प्रतीयोगीच्या आगमनाने अनुयोगी जात असतो. जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत अंधार जाऊ शकत नाही. तुम्ही कोणतेही कर्म करा काहीही उपयोग होत नाही. शेकडो जन्म जरी गेले आणि आत्मज्ञान झाले नाही तर मुक्त होऊ शकत नाही. ( हा श्लोक सुबोधाचार्य रचित आहे असेही मानले जाते. )म्हणून ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे श्रेयस्कर आहे.
-भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी(पाटील)तालुका नगर
संपर्क- ९४२२२२०६०३