सोयाबीनचा पेरा वाढला... मात्र रोगाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:22+5:302021-09-09T04:27:22+5:30

अहमदनगर : यंदा जिल्ह्यात तब्बल ९९ हजार ४१७ हेक्टरवर म्हणजे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. ...

Soybean sowing has increased ... but farmers are suffering from the disease | सोयाबीनचा पेरा वाढला... मात्र रोगाने शेतकरी त्रस्त

सोयाबीनचा पेरा वाढला... मात्र रोगाने शेतकरी त्रस्त

अहमदनगर : यंदा जिल्ह्यात तब्बल ९९ हजार ४१७ हेक्टरवर म्हणजे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. मात्र पाऊस लांबल्याने व सध्या त्यावर पडलेल्या रोगाने शेतकरी त्रस्त बनले आहेत. त्यामुळे उत्पादनातही पन्नास टक्क्याहून अधिक घट होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या हंगामात वेळेवर पाऊस झाला. त्यातच सोयाबीनला विक्रमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी या पिकाकडे वळले. तब्बल ९९ हजार ४१७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. पीकही जोमात आले. मात्र त्यानंतर पाऊस लांबला व पिवळा मोझेक रोग पडल्याने शेतकरी त्रस्त बनले आहेत. हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणूंमुळे उद्भवतो.

सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळ्या, खोडमाशी या किडींचा व तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोपाचे एखादे पान कडेने वाळू लागते आणि त्याची एखादी फांदी सुकलेली आढळते. नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी अंडी समूहांचा, अळ्यांचा वेळीच नायनाट केल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळता येतो. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे अनिवार्य झाल्यास क्लोरपायरीफॉस २० टक्के २० मि.लि., सायपरमेथ्रिन २५ टक्के ४ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.

-----

सोयाबीनचा पेरा हेक्टरमध्ये...

वर्ष पेरा मिळालेला भाव (क्विंटल)

२०१७ ७५१७४ २५००

२०१८ ८९८४४ ३५००

२०१९ ५२२८२ ४०००

२०२० ५४२९४ ३७००

२०२१ ९९४१७ ७५००

-----

दोन एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने उत्पादनात ६० ते ७० टक्के घट आली. बियाणे, शेतीची मशागत, पेरणी, कीटकनाशक औषधांची फवारणी याला मोठा खर्च आला. पण उत्पन्न घटल्याने खर्चही वसूल झाला नाही.

- गोरक्षनाथ नानाभाऊ तोडमल,

शेतकरी, जेऊर, नगर

----

सोयाबीनच्या चांगल्या उगवणीनंतर पावसाने ओढ दिली. याच कालावधीत ढगाळ वातावरणाने पिकावर रोगाचा परिणाम झाला. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे खर्च झालेले पैसेही वसूल होतील की नाही, याची शाश्वती नाही.

- गोवर्धन पवार,

शेतकरी, साकत खुर्द, नगर

Web Title: Soybean sowing has increased ... but farmers are suffering from the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.