सोयाबीन, कपाशी क्षेत्र वाढणार
By Admin | Updated: June 21, 2014 00:47 IST2014-06-20T23:34:10+5:302014-06-21T00:47:00+5:30
केडगाव : नगर तालुक्यात यंदा खरीप हंगामाचे क्षेत्र वाढवल्याने यावेळी २९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सोयाबीन, कपाशी क्षेत्र वाढणार
केडगाव : नगर तालुक्यात यंदा खरीप हंगामाचे क्षेत्र वाढवल्याने यावेळी २९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तालुक्यात सोयाबीन व कपाशी क्षेत्रात होणारी वाढ हे यंदाच्या खरिपाचे वैशिष्ट्य आहे. मात्र पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
नगर तालुक्याचे खरिपाचे क्षेत्र वाढल्याने आता पंचायत समितीच्या कृषी विभागाने २९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप लागवडीचे नियोजन केले आहे. तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान ५३१ मि.मी.इतके आहे. मागील वर्षी ६३५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाल्याने खरीप हंगाम यशस्वी झाला. यावेळीही शेतकऱ्यांना खरीप हंगामाकडून अपेक्षा आहेत.
खरिपाचे नियोजन- (आकडे हेक्टरमध्ये)- बाजरी ९ हजार २२०, मका २,१००, तूर- २०००, मुग- सहा हजार ५०, उडीद- ५०, भुईमुग- ४००, सुर्यफूल- ४१०, सोयाबीन क्षेत्र २०० हेक्टरवरून ७ हजार हेक्टर तर कपाशी क्षेत्र २०० हेक्टरवरून ५ हजार २०० हेक्टर इतके वाढले आहे. नगर तालुक्यात प्रथमच सोयाबीन व कपाशी लागवडीच्या उद्दिष्टात वाढ करण्यात आली आहे.
तुरळक ठिकाणी पेरणी
तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतही उरकली आहे. आता शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही तुरळक ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाल्याने तेथे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत. मात्र आता सर्वत्रच पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खरीप हंगाम तालुक्याला धोका देत आल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. याला मागील वर्षीचा हंगाम अपवाद आहे.
(तालुुका प्रतिनिधी)
खते,बियाणांचा तुटवडा
नगर तालुक्यात खरीप क्षेत्र वाढले असले तरी शेतकऱ्यांसाठी खते व बियाणांचा पुरवठा मुबलक आहे. बियाणांचा तुटवडा भासणार नाही. कांदा बियाणांचा थोडासा तुटवडा आहे.
-माधवराव देशमुख,
कृषी अधिकारी, पंचायत समिती