‘स्वराज्य’ सिंहगर्जनेचे शतक!

By Admin | Updated: May 30, 2016 23:55 IST2016-05-30T23:45:51+5:302016-05-30T23:55:06+5:30

योगेश गुंड अहमदनगर :‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या भारतीयांच्या मनात

Sovereign glory of 'Swarajya'! | ‘स्वराज्य’ सिंहगर्जनेचे शतक!

‘स्वराज्य’ सिंहगर्जनेचे शतक!

ऐतिहासिक घटना : नगरकरांनी जपल्या स्फूर्तिदायी आठवणी

योगेश गुंड
अहमदनगर :‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फूलिंग चेतविले त्या ऐतिहासिक घटनेची मंगळवारी शतकपूर्ती होत आहे.
३१ मे १९१६ रोजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यासाठी अहमदनगरमध्ये घेतलेल्या सभेत लोकमान्यांनी ही सिंहगर्जना केली होती. त्यानिमित्ताने अहमदनरचे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले. ही सभा ज्या ठिकाणी झाली तेथे आज इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी नगरकरांनी त्या ठिकाणी टिळकांचा अर्धपुतळा उभारून व त्याखालील चौथऱ्यावर या ऐतिहासिक घटनेचा तपशील कोरून ती स्फूर्तिदायक आठवण ताजी ठेवली आहे.
‘स्वराज्य’ या शब्दाविषयी ब्रिटिश सरकारला चीड असल्यानेच लोकमान्य टिळकांनी स्वराज्य ऐवजी होमरूल (स्वशासन) हा शब्दप्रयोग करण्याचे ठरवले होते. या चळवळीचा प्रचार व जनजागृतीसाठी टिळकांनी ३१ मे १९१६ रोजी येथील कापड बाजारातील ‘इमारत कंपनी’च्या वसाहतीच्या मैदानावर ही ऐतिहासिक सभा घेतली. तेव्हा टिळक युग ऐन भरात असल्याने त्यांच्याविषयी नगरकरांना मोठे आकर्षण होते. त्यामुळे सभेला नगरकरांनी प्रचंड गर्दी केली होती.
नगरकरांचा अपूर्व उत्साह पाहूनच टिळकांनी या सभेत स्वराज्याची हाक दिली. त्यानंतर हीच घोषणा टिळकांची सिंहगर्जना बनली.
१०० वर्षांपूर्वी मैदानात झालेल्या या सभेच्या ठिकाणी आज मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र वसाहतीच्या प्रशासनाने टिळकांच्या सभेची स्मृती जतन राहावी म्हणून येथील कापड दुकानाच्या मागील बाजूस लोकमान्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला आहे. त्यामुळे टिळकांच्या आठवणी आजही नगरकरांच्या मनात घर करून आहेत.
टिळक हे या सभेसाठी ३१ मे व १ जून असे दोन दिवस नगरमध्ये मुक्कामी होते. नगरच्या आधी त्यांनी बेळगाव येथे सभा घेतली. त्यांच्या होमरूल चळवळीच्या दौऱ्यातील नगर व बेळगावच्या सभा देशभर गाजल्या. नगरची सभा चौकर नामक वकिलांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगरचे भाषण स्वराज्य याच विषयावर केंद्रित होते. होमरूल चळवळीचा त्यांचा दौरा नगरलाच संपल्याचे सांगण्यात येते, कारण नगरच्या सभेनंतर त्यांचे कुठे भाषण झाल्याचा उल्लेख सापडत नाही. नगरच्या सभेनंतर टिळकांचे चार वर्षांनी निधन झाले.
--------------------
नगरची सभा अन् राष्ट्रद्रोहाचा खटला
लोकमान्य टिळकांचे नगरच्या सभेतील भाषण ब्रिटिश सरकारने आक्षेपार्ह असल्याचे ठरवून राष्ट्रद्रोहाखाली त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि २० हजार रुपयांचे दोन जामीन मागितले. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध टिळकांनी उच्च न्यायालयात अपील केले. ते मान्य करून न्यायाधीशांनी सरकारचा निर्णय रद्द ठरवला.
-----------------

Web Title: Sovereign glory of 'Swarajya'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.