निवडणूक संपताच टाकळी काझीतील कटुताही संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:19 IST2021-01-18T04:19:50+5:302021-01-18T04:19:50+5:30

केडगाव : नगर तालुक्यात नुकत्याच ५६ गावांच्या निवडणुका झाल्या. यात मोठा राजकीय संघर्ष उफाळून आल्याने गावागावांत कटुतेची भावना निर्माण ...

As soon as the election was over, the bitterness in Takli Qazi also ended | निवडणूक संपताच टाकळी काझीतील कटुताही संपली

निवडणूक संपताच टाकळी काझीतील कटुताही संपली

केडगाव : नगर तालुक्यात नुकत्याच ५६ गावांच्या निवडणुका झाल्या. यात मोठा राजकीय संघर्ष उफाळून आल्याने गावागावांत कटुतेची भावना निर्माण झाली. काही जागांवर जवळचेच नातलग एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मात्र, चुरशीची लढत होऊनही टाकळी काझी गावातील दोन्ही आघाड्यांनी एकत्र येत चहापान तर केलेच; पण एकत्रित गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन झाले गेले विसरून जायचे असा सूर आळवला.

ग्रामपंचायत निवडणुका म्हटले की, गावात वाद-विवाद आलेच. हा या गटाचा तो त्या गटाचा. यातून राजकीय वाद-विवाद होऊन गावातील शांतता व एकोपा नाहीसा होतो. यामुळे गावातील वातावरण बिघडते; परंतु निवडणुकीत मतदान करून उत्सव साजरा करणारे गाव आपण पाहिले नसेल. टाकळी काझी या गावात मतदान झाल्यानंतर सर्व विरोधक एकत्र येतात. चहापाणी एकत्र घेतात व गावचे ग्रामदैवत असणाऱ्या मारुती मंदिरात आरती करून निवडणुकीत झाले गेले ते सगळे विसरून लोकशाहीचा हा उत्सव आनंदात साजरा करतात. साडेपाच वाजता मतदान संपल्यानंतर हे सर्व विरोधक एकत्र आले. त्यांनी एकत्र येत चहा घेतला. निवडणुकीतील चर्चा रंगल्या. नंतर गावचे ग्रामदैवत असणाऱ्या मारुती मंदिरात जाऊन मारुतीची आरती केली. त्यानंतर सिद्धार्थ बुद्ध विहार या ठिकाणी जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांची वंदना म्हणण्यात आली.

निवडणूक संपली आता राजकीय संघर्षही संपला असा एकीचा नारा त्यांनी दिला. या गावात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात पारंपरिक लढत झाली. सेनेला भाजपने मदत केल्याचे दुर्मीळ उदाहरण येथे घडले. निवडणुकीचा निकाल काहीही लागो; पण गावातील एकोपा टिकला पाहिजे, अशीच भावना यावेळी दोन्ही आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली.

यावेळी स्वाभिमानी विकास पॅनलचे शंकरराव ढगे, काशीनाथ गावडे, आसाराम मोटे, बाळासाहेब येवले, संभाजी पवार तर शेतकरी विकास पॅनलचे संपतराव म्हस्के, वसंतराव म्हस्के, बाबासाहेब मोटे यांच्यासह पॅनलचे प्रमुख उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: As soon as the election was over, the bitterness in Takli Qazi also ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.