साईबाबांना नैवेद्य बनवणाऱ्या कंत्राटी महिलेचा मुलगा झाला डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:32+5:302021-07-05T04:14:32+5:30
विदेशात वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात वैद्यकीय सेवेची मान्यता मिळण्यासाठी परराष्ट्र वैद्यकीय परीक्षेच्या दिव्यातून जावे लागते. शिर्डीतील अभिषेक कासार ...

साईबाबांना नैवेद्य बनवणाऱ्या कंत्राटी महिलेचा मुलगा झाला डॉक्टर
विदेशात वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात वैद्यकीय सेवेची मान्यता मिळण्यासाठी परराष्ट्र वैद्यकीय परीक्षेच्या दिव्यातून जावे लागते. शिर्डीतील अभिषेक कासार याने या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून शिर्डी व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. अभिषेक हा साई संस्थानचे लिपिक रावसाहेब कासार व अनेक दिवस साईबाबांसाठी मंदिरात नैवेद्य बनवण्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगार संगीता कासार यांचा मुलगा आहे.
अभिषेक याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिर्डीतील साईनाथ विद्यालयात मराठी माध्यमातून तर उच्च शिक्षण एसएसजीएम कॉलेज, कोपरगाव येथून घेतले. यानंतर त्याने चीन येथील जीनागक्सी विद्यापीठातून एमबीबीएस पदवी घेतली. भारताबाहेर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यंदा राष्ट्रीय परीक्षा बोर्डामार्फत झालेल्या परीक्षेत अभिषेकने देशात आठवा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला. त्याला या परीक्षेत ३०० पैकी २२६ गुण मिळाले. या परीक्षेचा निकाल अवघा २३.७३ टक्के लागला आहे.