काही तरी मूल्यमापन व्हायला हवे होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST2021-04-04T04:21:27+5:302021-04-04T04:21:27+5:30
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांच्या कोणत्याही परीक्षा न होता या ...

काही तरी मूल्यमापन व्हायला हवे होते
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांच्या कोणत्याही परीक्षा न होता या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय शनिवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. या निर्णयाच्या संमिश्र प्रतिक्रिया समाजात उमटल्या आहेत. ‘लोकमत’ने काही पालकांना याबाबत बोलते केले असता, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने घेतलेला निर्णय योग्य वाटतो. मात्र, जसे वर्षभर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होते, त्याचप्रमाणे ऑनलाइन किंवा इतर पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायला हवे होते. कोणतेही मूल्यमापन न करता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवले तर त्यांना त्याचे गांभीर्य राहणार नाही, असे काही पालकांचे म्हणणे आहे. तर काही पालकांच्या मते विद्यार्थ्यांना जरी पुढील वर्गात नेण्याचा निर्णय झाला तरी पुढच्या वर्गात शिक्षकांनी त्याचा राहिलेला अभ्यास पूर्ण करून घ्यावा म्हणजे विद्यार्थी अपडेट राहील.
दुसरीकडे शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. वर्षभर आम्ही ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला आहे. आता शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून तोच योग्य असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
----------------
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. महामारीच्या गंभीर प्रसंगी विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा न घेण्याचा निर्णय बरोबर आहे.
- पोपट धामणे, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, निंबळक, ता. नगर
--------------
कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास घेतलेला आहे. मध्यंतरी पाचवी ते आठवी शाळा सुरू झाल्या होत्या. त्यातही काही मूल्यमापन झाले. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासनाने घेतलेला निर्णय योग्य वाटतो.
- किशोर जगताप, मुख्याध्यापक, जि.प. शाळा, धनगरवाडी, ता. राहाता
---------
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शासनाने जरी विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला असला तरी पुढील वर्गात गेल्यानंतर राहिलेला अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. म्हणजे त्याचे त्या वर्गातील नुकसान होणार नाही.
- अर्चना मरकड, अध्यक्षा शालेय व्यवस्थापन समिती, जि.प. शाळा, मढी, ता. पाथर्डी.
--------------
परीक्षा होणार नसल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही मूल्यमापन होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेल्यासारखे आहे. ऑनलाइन पद्धतीने किंवा इतर मार्गे काही तरी मूल्यमापन व्हायला हवे होते.
- संदीप लोंढे, पालक, केडगाव.