जनआरोग्य योजनेबाबतचे रुग्णालयांचे प्रश्न सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:36+5:302021-05-27T04:22:36+5:30
अहमदनगर : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात रुग्णालयांना भेडसावणारे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. डॉक्टरांच्या मागणीप्रमाणे योजनेत आवश्यक ते ...

जनआरोग्य योजनेबाबतचे रुग्णालयांचे प्रश्न सोडविणार
अहमदनगर : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात रुग्णालयांना भेडसावणारे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. डॉक्टरांच्या मागणीप्रमाणे योजनेत आवश्यक ते बदल केले जातील. तसेच ही योजना खाजगी रूग्णालयाच्या सहकार्याने राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला दिले.
हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जनआरोग्य योजनेसंदर्भात मुंबई येथे आरोग्यमंत्री व या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जे. टी. पोळ, नगर येथील डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. संजय कदम, डॉ. हिमांशू गुप्ता, डॉ. बळीराम बागल, डॉ. राजेंद्र गोस्वामी, डॉ. चिन्मय एराम, डॉ. राज वैद्य आदी उपस्थित होते.
जनआरोग्य योजना सुरु होऊन अकरा वर्ष झाले, मात्र या योजनेचे पुनरावलोकन झाले नाही. आजारासंबंधी पॅकेजमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. प्रत्यक्षात उपचारांच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. रुग्ण व रुग्णालयांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणे, येत्या पंधरा दिवसात हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनच्या संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडून आजाराविषयी पॅकेज दरासंबंधी माहिती मिळवणे, राज्यस्तरावर योजनेचे पुनरावलोकन करणे, ही योजना जास्त प्रभावीपणे राबविण्यासाठी स्टेट हेल्थ इन्शुरन्स सोसायटी, इन्शुरन्स कंपनी आणि हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनचे काही तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती स्थापन करणे तसेच कोविड रुग्णालयाला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या नोटिसांचा लवकरात लवकर निपटारा करणे, आदी विषय डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने मंत्र्यांसमोर मांडले. येत्या पंधरा दिवसात हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांकडून आलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून जन आरोग्य योजनेचे पुनरावलोकन केले जाईल, असे आश्वासन यावेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी शिष्टमंडळाला दिले.
........
जिल्हा रुग्णालयातून मोफत इंजेक्शन देणार
कोरोनाग्रस्त व म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना चांगल्या प्रकारचे उपचार देण्यासाठी तसेच या रुग्णांना लागणारे इंजेक्शन जिल्हा रुग्णालयाकडून मोफत उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन यावेळी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी सांगितले.
.........
ओळी-२६डॉक्टर
हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मागण्यांचे निवेदन देताना डॉ. जे. टी. पोळ समवेत डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. संजय कदम, डॉ. हिमांशू गुप्ता आदी.