तिसगावच्या स्मशानभूमीतील वेगवेगळे प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:03+5:302021-06-29T04:15:03+5:30
तिसगाव : दहा हजार लोकवस्ती व तालुक्यातील महसुली दृष्ट्या सर्वाधिक उलाढालीचे गाव असलेल्या तिसगाव (ता. पाथर्डी) येथील स्मशानभूमीची स्वच्छता ...

तिसगावच्या स्मशानभूमीतील वेगवेगळे प्रश्न सोडवा
तिसगाव : दहा हजार लोकवस्ती व तालुक्यातील महसुली दृष्ट्या सर्वाधिक उलाढालीचे गाव असलेल्या तिसगाव (ता. पाथर्डी) येथील स्मशानभूमीची स्वच्छता करावी. कायमस्वरूपी तेथे स्वच्छता कर्मचारी नेमावा. मयताला खांदा देण्यासाठी शिड्या उपलब्ध करून द्याव्यात. मासिक सभेत वेळोवेळी यावर चर्चा होते. मात्र व्यथा सुटत नाहीत. आता प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन छेडू असा इशारा निवेदन देत ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे यांनी दिला.
कोरोना महामारीचे सावटात मरणानंतरच्या सुविधा तरी उपलब्ध करून द्या, या आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. सेवा संस्थेचे संचालक वाल्मीक गारुडकर यांनी ऐतिहासिक वेस परिसरातील अनधिकृत बांधकामे या विषयावर जाहीर तक्रारी केल्याचे प्रकरण ताजे आहे. या पार्श्वभूमीवरच लोखंडेची पोस्ट आल्याने अंतर्गत व्यथा सार्वत्रिक झाल्या आहेत.
---
गावच्या मुख्य महामार्गालगतच्या नदी किनारी स्मशानभूमी आहे. येथील वेगवेगळे प्रश्न सोडवावेत, अशा आशयाचे निवेदन दिले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अनोखे आंदोलन करून हा विषय जनतेत नेऊ.
-नंदकुमार लोखंडे,
ग्रामपंचायत सदस्य, तिसगाव
--
अंत्यविधीची माहितीसह स्मशानभूमी परिसरात भीती न बाळगता काम करणाऱ्या व्यक्ती उपलब्ध होत नाहीत. अशा व्यक्ती मिळाल्यास सर्वानुमते मेहनताना ठरवून नेमणूक करू.
-भाऊसाहेब सावंत,
ग्रामविकास अधिकारी, तिसगाव