राजकारणी, साहित्यिकांमधील दरी वाढल्याने समाज बिघडतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:31+5:302021-08-14T04:25:31+5:30
पाथर्डी : साहित्य व कला क्षेत्रातील प्रतिभा ही परमेश्वराने सर्वांनाच दिली आहे. मात्र त्याचा सदुपयोग फारच थोडे करतात. भाषेतून ...

राजकारणी, साहित्यिकांमधील दरी वाढल्याने समाज बिघडतोय
पाथर्डी : साहित्य व कला क्षेत्रातील प्रतिभा ही परमेश्वराने सर्वांनाच दिली आहे. मात्र त्याचा सदुपयोग फारच थोडे करतात. भाषेतून व्यक्त होण्याचे सामर्थ्य कवी व विचारवंतांमध्ये असते. जेव्हा माणूस एखादे पुस्तक वाचतो तेव्हा तो पुस्तकाच्या व्यक्तिरेखांमध्ये स्वत:ला पाहतो. राजकारणी व साहित्यिकांची दरी वाढत चालल्यामुळे समाज बिघडत चालला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांनी केले. बाबूजी आव्हाड महाविद्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार स्व. बाबूजी आव्हाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित साहित्यप्रेमी बाबूजी आव्हाड साहित्य जागर कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे अध्यक्ष अविनाश मंत्री होते. व्यासपीठावर पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेश आव्हाड, विश्वजीत गुगळे, सुनील साखरे, रामकिसन शिरसाट, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे आदी उपस्थित होते.
दौंड म्हणाले, पाथर्डी तालुक्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व साहित्यिक क्षेत्रात माजी आमदार स्व. बाबूजी आव्हाड यांचे मोलाचे योगदान आहे. तालुक्यातील साहित्यिक ऊसतोडणी कामगारांवर साहित्य लिहितात. मात्र बाबूजींनी त्यांची परिस्थिती बदलण्याचे महान कार्य केले. तोडणी कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा करायची असेल तर त्यांना अनुदान मदत न देता त्यांच्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे. तरच त्यांच्या हातातून कोयता जाईल हे लक्षात ठेवून त्यांनी पार्थ विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली.
यावेळी संजय मेहरकर, प्रा. रमेश मोरगावकर यांचा सन्मान करण्यात आला. अजय रक्ताटे यांच्याकडून काव्यसंग्रह भेट देण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य जी. पी. ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बबन चौरे यांनी केले. डॉ. सुभाष शेकडे यांनी आभार मानले.
डॉ. अशोक कानडे, डॉ. अभिमन्यू ढोरमारे, साहित्यिक अनंत कराड, संदीप काले, लक्ष्मण खेडकर, अर्जुन देशमुख, वसंत होळकर, ज्योती आधाट, हुमायून आतार, निवृत्ती शेळके, बाळासाहेब चिंतामणी, चंद्रकांत उदागे, बबन शेवाळे, राजकुमार घुले, प्राचार्य अशोक दौंड आदी उपस्थित होते.
-----
१३ पाथर्डी आव्हाड
पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना साहित्यिक कैलास दौंड.