सोबलेवाडी, बुगेवाडी कोरोनामुक्तीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:21 IST2021-05-19T04:21:34+5:302021-05-19T04:21:34+5:30
पारनेर : एका-एका दिवसात आठ ते दहा रुग्ण बाधित होत असल्याचे पाहून पारनेरजवळील सोबलेवाडी, बुगेवाडीमधील युवकांनी एकत्र येऊन रुग्णांना ...

सोबलेवाडी, बुगेवाडी कोरोनामुक्तीच्या मार्गावर
पारनेर : एका-एका दिवसात आठ ते दहा रुग्ण बाधित होत असल्याचे पाहून पारनेरजवळील सोबलेवाडी, बुगेवाडीमधील युवकांनी एकत्र येऊन रुग्णांना त्वरित उपचारासाठी वाहन उपलब्ध करणे, घरोघरी जाऊन तपासणी करणे, उपचारासाठी तातडीने दाखल करणे असे उपक्रम राबवले. त्यामुळे सोबलेवाडी, बुगेवाडी कोरोना मुक्तीच्या मार्गावर आहे.
पारनेर जवळील सोबलेवाडी, बुगेवाडी परिसरात मागील महिन्यात व अलीकडे १५ दिवसांत मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढली होती. तेथील युवकांनी एकत्र येऊन यावर तातडीने निर्णय घेण्याचा विचार केला. नवनाथ सोबले यांनी स्वतः पुढाकार घेत रुग्णांची वाहतूक करण्यासाठी तातडीने वाहन उपलब्ध करून दिले. त्यामुळे रुग्णांना पारनेरमध्ये उपचारासाठी दाखल करणे, कोरोना चाचणीसाठी ने-आण करणे ही सुविधा झाली. स्वतः युवकांना बरोबर घेऊन प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे ऑक्सिजन, ताप तपासणी सुरू केली. ज्यांना त्रास जाणवत असेल त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करणे आदी नियोजन केले. त्यामुळे येथील रुग्ण संख्या कमी होत आहे. युवकांच्या एकजुटीने काम केल्याचा नागरिकांना फायदा झाला आणि कोरोना हद्दपार होण्यासाठी मोठी मदत होत आहे, असे दादाभाऊ कावरे यांनी सांगितले.
------सोबलेवाडी, बुगेवाडी परिसरात रुग्ण वाढत होते. आम्ही प्रथम रुग्णांना सोयीसाठी वाहन सुविधा सुरू केली. त्याचा फायदा नागरिकांना झाला. वेळेवर उपचार झाले. अनेकांची कोरोना चाचणी करून घेतली. यामुळे दररोज १० ते १२ रुग्ण असणाऱ्या सोबलेवाडी, बुगेवाडी परिसरात आता केवळ एक ते दोन रुग्ण बाधित आहेत.
- नवनाथ सोबले, युवक, सोबलेवाडी
----------सोबलेवाडी, बुगेवाडी, भाळवणीसह अनेक ठिकाणी आता युवक वेगवेगळ्या पद्धतीने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने प्रशासनाला मोठे सहकार्य होत आहे.
- सुधाकर भोसले, प्रांताधिकारी, पारनेर-श्रीगोंदा