तर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:50+5:302021-03-13T04:37:50+5:30
कृषी विभागाची महाडीबीटी योजना : कागदपत्र जमा करण्यास दहाच दिवसांची मुदत रोहित टेके लोकमत न्यूज नटवर्क कोपरगाव : राज्य ...

तर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही
कृषी विभागाची महाडीबीटी योजना : कागदपत्र जमा करण्यास दहाच दिवसांची मुदत
रोहित टेके
लोकमत न्यूज नटवर्क
कोपरगाव : राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत या आर्थिक वर्षासाठी महाडीबीटी योजनेंतर्गत यांत्रिकीकरण तसेच ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. निवड झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन कागदपत्र अपलोड करण्यासाठी ८ मार्चपासून पुढील दहाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुदतीत ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता केली नाही. तर या योजनेत लाभ मिळणे अवघड होणार आहे.
या अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण व ठिबक सिंचन यांसह विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज केला होता. त्यानुसार यांत्रिकीरणासाठी कोपरगाव तालुक्यातील सुमारे ७९ तर ठिबकसाठी ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची निवड झाली आहे. या योजनेत जे यंत्र घ्यायचे आहे, त्यासाठी कृषी विभागाकडे मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा लागत होता. कागदपत्रांची पूर्तता स्थानिक कार्यालयात करून शेतकऱ्याला यंत्र खरेदीसाठी मंजुरी दिली जायची. यंत्र पाहणी करून अनुदानाचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविला जात होता.
यंदाच्या योजनेत सर्वच कागदपत्रे ऑनलाइन दाखल करायचे आहेत. त्यानुसार यंत्रखरेदीसाठी ऑनलाइन मंजुरी देऊन अनुदानाच्या प्रस्तावालादेखील ऑनलाइन मंजुरी दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्र प्राप्त होणार नाहीत, अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यांची नावे रद्द होऊन पुढील शेतकऱ्यांची नावे येणार आहेत. या योजनेत निवड झालेल्या फक्त एकाच शेतकऱ्यांचा कागदपत्राची पूर्तता केलेला ऑनलाइन प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयात प्राप्त झाला आहे.
...............
योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत आपली कागदपत्रे ऑनलाइन उपलोड करावी. जेणे करून त्यांची तपासणी करून यंत्र खरेदीसाठी मंजुरी देण्यात येईल. ज्यांची कागदपत्रे वेळेत उपलोड होणार नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही व त्यांची नावे रद्द होऊन पुढील शेतकऱ्यांची नावे घेतली जातील. शेतकऱ्यांनी यासाठी स्थानिक कृषी सहायक यांची मदत घ्यावी.
- अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव.