नागपंचमीला सापाला पुजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:14+5:302021-08-14T04:25:14+5:30
कोपरगाव : महाराष्ट्रात सर्वत्र नागपंचमीनिमित्त नागोबा देवतेचे पूजन अनादिकाळापासून चालत आलेल्या प्रथेनुसार आजही सर्वत्र होत आहे. मनुष्यप्राणी हा निसर्गपूजक ...

नागपंचमीला सापाला पुजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते?
कोपरगाव : महाराष्ट्रात सर्वत्र नागपंचमीनिमित्त नागोबा देवतेचे पूजन अनादिकाळापासून चालत आलेल्या प्रथेनुसार आजही सर्वत्र होत आहे. मनुष्यप्राणी हा निसर्गपूजक असल्याने निसर्गातील प्रत्येक घटकाचा आदरपूर्वक सन्मान करत आलेला आहे. सापाची पूजा ही ऋण बाळगून कृतज्ञता वक्त करण्याचाच एक भाग आहे. मात्र, याच सापांची नागपंचमीला पूजा होते आणि इतर दिवशी का मारले जाते, हे आजतागायत न उलगडणारे कोडे आहे.
राज्यात आढळणाऱ्या सापाच्या एकूण प्रजातींमध्ये प्रामुख्याने विषारी आणि बिनविषारी सापाची वर्गवारी केली जाते. साप हा निसर्गातील घटक आहे, तसेच सापाबद्दल आजही अनेक अंधश्रद्धा आहेत. यातूनच खऱ्या अर्थाने सापाला मारले जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सापांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, सर्प मित्र संघटनांच्या माध्यमातून सापांना जीवनदान दिले जात असल्यामुळे सापांचे प्रमाण वाढू लागले आहे.
.........
जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
नाग, मण्यार, घोणस, फुरसे.
............
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप
धामण, मांडूळ, तस्कर, गवत्या, दिवड, कवड्या, वाळा.
............
साप आढळला तर...
घरात किंवा शेतात साप आढळला, तर त्यास मारून न टाकता तात्काळ एखाद्या सर्पमित्राशी संपर्क केल्यास तो साप विषारी आहे की बिनविषारी, हे समजू शकते. त्यानंतर साप पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले जाते. घरात साप आढळून आला तर त्याच्यापासून पाच ते सहा फूट अंतर राखून उभे राहावे. घोणस जातीच्या साप हा मनुष्यावर हल्ला करू शकतो. घराच्या परिसरात ज्या ठिकाणाहून साप येण्याची शक्यता वाटते, त्या ठिकाणी रॉकेल आणि पाणी शिंपडावे, तसेच साप चावल्यानंतर नागरिकांचा भीतीपोटीच मृत्यू होतो. त्यामुळे साप चावल्यानंतर भीती न बाळगता रुग्णालयात उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.
.............
साप हा तर शेतकऱ्याचा मित्र
उंदराची एक जोडी वर्षाला ९३० पिलांना जन्म देते. जगात उत्पन्न होणाऱ्या ऐकून अन्नधान्यापैकी २० टक्के धान्य उंदरांद्वारे नष्ट होते. धामण जातीच्या सापाला सतत खायला लागत असल्याने उंदीर, बेडूक तसेच विषारी सापाची, अंडी, पिले हे त्याचे प्रमुख खाद्य असते. त्यामुळे धामण साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे.
.................
अनादिकाळापासून साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतात साप असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण, सापामुळे शेतातील उंदरांचा नायनाट होतो. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत नाही. सापांना जरी शेतकऱ्यांचा मित्र म्हटले तरी माणूसच खरा सापाचा शत्रू आहे. साप दिसला की, लगेच आपण काठी घेऊन धावतो. सापांबद्दल पूर्वीपासून बऱ्याच अंधश्रद्धा आहेत, तसेच साप हा निसर्गचक्रातील महत्त्वाचा वन्यजीव आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, तसेच सापांच्या विषापासून वेगवेगळी औषधी बनविल्या जातात.
-अरुण दवणे, सर्पमित्र, वारी ता. कोपरगाव
..............
स्टार १०३९