कापडबाजारात चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: July 4, 2014 01:22 IST2014-07-04T01:21:02+5:302014-07-04T01:22:18+5:30

अहमदनगर : कापडबाजारातील महात्मा गांधी रोडवरील एका ओळीतील सलग आठ दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेवर डल्ला मारला.

Smugglers in the clothes market | कापडबाजारात चोरट्यांचा धुमाकूळ

कापडबाजारात चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर : कापडबाजारातील महात्मा गांधी रोडवरील एका ओळीतील सलग आठ दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेवर डल्ला मारला. आठही दुकानांमधून अडीच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास दुकानांच्या पाठीमागील बाजूने छतावर येऊन जिन्याचे दार तोडून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश करून चोरी केली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान भिंगारवाला चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात (फुटेज) गाठोडे घेऊन पसार झालेल्या दोघांच्या हालचाली कैद झाल्या आहेत.
भिंगारवाला चौकातील डी.एम. मुळे चष्मावाला यांचे दुकान ते मुथा कलेक्शन अशा शेजारी-शेजारी असलेल्या आठ दुकानांमध्ये ही चोरी झाली. दुकानांच्या मागील बाजूने ए.सी.चे बॉक्स, पाईप यावरून चोरटे छतावर चढले. छतावरील जिन्याचे दरवाजे, खिडक्या तोडून त्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला. सर्व दुकानांमध्ये तिजोरीची उचकापाचक केली. तिजोरीमधील रोख रक्कम चोरली.
कॉटन किंग या दुकानामध्ये चोरट्यांनी कपडे घालून पाहिले. तसेच दुकानातील लाल रंगाचा शर्ट घालून एक चोरटा पळाला. चोरट्यांनी कपड्याची उचकापाचक केली. या दुकानातील दीड हजार रुपयांची कॅश चोरीला गेल्याचे दुकानाचे मालक नरेंद्र मधुकर रासने यांनी सांगितले. आनंद मुथा यांच्या मुथा क्लॉथ या दुकानामध्ये ३० हजार रुपयांची रोकड चोरली. राहुल मुथा यांच्या मुथा ड्रेसेस या दुकानातून ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. मुथा कलेक्शनमध्ये सर्वात जास्त रक्कम होती. चोरट्यांनी १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड चोरल्याचे दुकानाचे मालक विक्रम मुथा यांनी सांगितले. डी.एम.मुळे चष्मावाला यांच्या दुकानातून २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरली आहे,असे दुकानाचे मालक मुकुंद मुळे यांनी सांगितले. त्यांच्या दुकानातही चोरटे पाठीमागच्या बाजूने छतावर चढले. खिडक्यांची लोखंडी जाळी तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
राजेंद्र बाबुलाल शहा यांच्या आराम गादी कारखाना या दुकानातून ३ हजार २०० रुपयांची रोकड चोरली. रामविलास बिहाणी यांच्या भाग्योदय होजिअरी या दुकानातून ३ हजार रुपये चोरले. जरीवाला स्टोअर्स या दुकानामध्ये कपड्यांची उचकापाचक करण्यात आली. काहीही रोख रक्कम गेली नसली तरी स्नेहालय आणि गोशाळेसाठी ठेवलेल्या बॉक्समधील चिल्लर पैशांचे दोन पेट्यांमधील पैसे चोरीला गेल्याचे जरीवाला दुकानाचे मालक कृष्णकांत गांधी यांनी सांगितले. या आठ दुकानांमधून गेलेली एकूण रोकड ही अडीच लाखापर्यंत आहे. (प्रतिनिधी)
सकाळी उघडकीस
1बुधवारी कापडबाजार बंद होता. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास दुकान मालकांनी दुकान उघडल्यानंतर चोऱ्या झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी वाय.डी. पाटील, कोतवालीचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे, सहायक आणि पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. दुकानांच्या पाठीमागील बाजूने चढून चोरट्यांनी प्रवेश करून दुकानात चोरी केली आहे. चोरटे अल्पवयीन आणि माहितीगार आहेत. दोन चोरट्यांनी पायात काहीही घातले नव्हते, तर एकाने स्पोर्टस शूज घातले होते, अशी माहिती तपासात पुढे आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. एका चोरट्याने एका दुकानातून नाईट पॅन्ट घालून गेल्याचीही माहिती हाती आली आहे. दरम्यान दोन संशयितांना पोलिसांनी कोठी चौकात चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच रेकॉर्डवरील सर्व सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हा दाखल
2आठ दुकानांच्या मालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात एकत्रित फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भारत जाधव तपास करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दुपारी व्यापाऱ्यांशी चर्चा करून अधिक माहिती घेतली. चोरटे हे माहितीतले असावेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. रात्री दहाच्या पुढे बाजारातील खाद्यपदार्थांच्या हातगाड्या बंद झाल्या तर चोरट्यांवर लक्ष केंद्रीत करणे सोपे जाईल, असे त्यांनी सांगितले.
फुटेजमध्ये चौघेजण
3भिंगारवाला चौकात शिवसेनेच्यावतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. या चौकात परदेशीगल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री बारा ते एकपर्यंत चौघेजण ठाण मांडून होते. दोघांनी गाड्यांवर आईस्क्रीम खाल्ले. नंतर दोन तास ते एकाच जागेवर येरझाऱ्या घालत होते. साडेबारा वाजता पोलिसांची गाडी येताच ते एका गल्लीमध्ये घुसले. गाडी गेल्यानंतर पुन्हा ते दुकानाच्या दिशेने धावले. त्यानंतर पहाटे पावणेपाच वाजता दोघा चोरट्यांनी एका गाठोड्यासह पळ काढल्याचे चित्रणात दिसले आहे. कॅमेऱ्यातील चित्रीकरण असलेले पेन ड्राईव्ह आणि कॅमेऱ्यातील घटनाक्रम असलेली माहिती आमदार अनिल राठोड, विक्रम राठोड, मंदार मुळे यांनी कोतवाली पोलिसांकडे सोपविली आहे.

Web Title: Smugglers in the clothes market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.