टाकळीभान : टाकळीभान गावातील वीजपुरवठ्याच्या संदर्भातील विविध अडचणींबाबत उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित कांबळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनील बोडखे, गणेश नागले उपस्थित होते.
गावातील महादेव मंदिर, लांडगे वस्ती व इतर ठिकाणीची रोहित्रे जुनी झाली असून त्यामुळे गावाला खंडित वीजपुरवठा होत आहे. या रोहित्रांची दुरुस्ती करण्यात यावी, राज्य सरकारच्या योजनेनुसार गावातील एकूण वीजबिल वसुलीतून ३३ टक्के रक्कम गावातच रोहित्रांवर खर्च करावी, अशी मागणी खंडागळे यांनी केली.
ग्रामपंचायतीच्या विहिरीवर लिंक लाइन फीडरचे (२४ तास वीज) काम लवकरात लवकर सुरू करावे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेंतर्गत गावातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना ५०० रुपये अनामत रकमेत वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी, ‘महावितरण आपल्या दारी’ हे अभियान राबवावे, गणेशखिंड उपकेंद्राच्या परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. अभियंता कांबळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे खंडागळे यांनी सांगितले.
------