पतीसोबत देवदर्शनाला आलेल्या वधूची प्रियकरासोबत धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 15:12 IST2019-06-20T15:11:51+5:302019-06-20T15:12:44+5:30
नवीनच लग्न झालेले नवरदेव-नवरी पाथर्डी तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी आले होते. या देवदर्शनादरम्यान संधी साधत नववधूने प्रियकरासोबत धूम ठोकली.

पतीसोबत देवदर्शनाला आलेल्या वधूची प्रियकरासोबत धूम
अहमदनगर : नवीनच लग्न झालेले नवरदेव-नवरी पाथर्डी तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी आले होते. या देवदर्शनादरम्यान संधी साधत नववधूने प्रियकरासोबत धूम ठोकली. ही घटना काल घडली.
शेवगाव तालुक्यातील तरुणाचातीन दिवसांपूर्वी विवाह झाला होता. हे नवरदेव -नवरी देवदर्शनासाठी मढी येथील कानिफनाथांच्या दर्शनासाठी आले होते. मंदिरापासून दूर असणा-या देवस्थानच्या पार्कींगमध्ये दुचाकी लावून दोघेही समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले. दर्शन घेतल्यानंतर ते बाहेर आले. या जोडप्याच्या मागोमाग नववधूचा प्रियकरही संधीची वाट पाहत होता. देवस्थानच्या वाहनतळावर लावलेली दुचाकी आणण्यासाठी नववधूने नवरदेवास पाठविले. दुचाकी लांब लावलेली असल्याने नवरदेवास पुन्हा येण्यास वेळ लागणार होता. या संधीचा फायदा उठवत प्रियकराच्या दुचाकीवर बसून नववधूने धूम ठोकली. दुचाकी घेऊन आलेल्या नवरदेवाला शोधाशोध करूनही पत्नी न दिसल्याने त्याने आजूबाजूच्या दुकानदाराकडे चौकशी केली. देवस्थानमधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर प्रियकराच्या दुचाकीवर नववधू पसार झाल्याचे दिसले.
याबाबत पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.