कर्जुले हर्या बनणार ‘स्मार्ट व्हिलेज’
By Admin | Updated: April 9, 2016 00:29 IST2016-04-09T00:28:31+5:302016-04-09T00:29:50+5:30
विनोद गोळे, पारनेर गावामधील भुयारी गटारीसह रस्ते, गावातील सुविधा यासह वाड्या-वस्त्यांचा नियोजनबध्द विकास आराखडा तयार करून कर्जुले हर्या गाव

कर्जुले हर्या बनणार ‘स्मार्ट व्हिलेज’
विनोद गोळे, पारनेर
गावामधील भुयारी गटारीसह रस्ते, गावातील सुविधा यासह वाड्या-वस्त्यांचा नियोजनबध्द विकास आराखडा तयार करून कर्जुले हर्या गाव जिल्ह्यातील पहिले स्मार्ट गाव बनणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्मार्ट व्हिलेजमध्ये या गावाचा समावेश केला असून आता पुढील पन्नास वर्षे समोर ठेवून नियोजनबध्द विकास करण्यात येणार आहे.
नगर-कल्याण महामार्गावर टाकळीढोकेश्वरनजीक कर्जुले हर्या गाव आहे. गावाचा विकास साधण्यासाठी आमदार विजय औटी यांनी आमदार दत्तक ग्राम योजनेंतर्गत गाव दत्तक घेतले आहे. गावात शिवसेना नेते, उद्योेगमंत्री सुभाष देसाई यांच्या निधीतून सुंदर वैकुंठधाम तयार करण्यात आले आहे. यासह विविध योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. हरेश्वर देवस्थानचे सचिव शिवाजी शिर्के व सरपंच साहेबराव वाफारे यांनी आ. औटी यांची भेट घेऊन गावातील विविध प्रश्नांची माहिती दिली. यावेळी औटी यांनी उद्योगमंत्री देसाई यांच्याशी चर्चा केली. व आमदार दत्तक गाव योजनेत आपण कर्जुले हर्या गाव दत्तक घेतले असून त्याचा समावेश स्मार्ट व्हिलेज मध्ये करण्यात यावा, अशी मागणी केली.
भुयारी गटारी योजना यासह गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासह सुमारे दोन कोटी रूपयांची विकास कामेही झाली आहेत.
कर्जुले हर्या गावातील सर्व परिसर व वाड्या-वस्त्या यांचे सर्व्हेक्षण स्मार्ट व्हिलेज योजनेचे अधिकारी करणार आहेत. सर्व्हेक्षणानंतर पुढील पन्नास वर्षात वाढणारी लोकसंख्या ,त्यानुसार गावात पाणीपुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था, विकासात्मक योजना यांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार आहे. संपूर्र्ण गाव डिजीटल, वाय-फाय सुविधा, यासह रेशनकार्ड, विविध शासकीय योजना थेट आॅनलाईन होणार आहेत. गावातील भौतिक सुविधा व अत्याधुनिक सुविधा याचे वर्गीकरण करून त्याचा विकासटप्पा ठरविला जाणार आहे.
आमदार विजय औटी यांनी कर्जुले हर्या स्मार्ट व्हिलेज होण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत सुमारे दोन कोटींची कामे झाली असून आता गावाचा समावेश या योजनेत झाल्याने कोट्यावधी रूपयांचा निधी येऊन नियोजनबध्द विकास होईल.
- शिवाजी शिर्के,सचिव, हरेश्वर देवस्थान ट्रस्ट,कर्जुले हर्या,ता पारनेर
स्मार्ट वैकुंठधाम
कर्जुले हर्या गावात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वैेकुंठधाम सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्यावर हरेश्वर देवस्थानचे सचिव शिवाजी शिर्के यांनी गावातील लोकांना एकत्रित बोलावून स्मार्ट आराखडा तयार केला आहे. त्यातून आता वैकुंठधाममध्ये विविध अत्याधुनिक सुविधा करण्यात आल्या आहेत. वैकुठधामही स्मार्ट बनले आहे.