सैनिकी मुलींच्या वसतिगृहात कत्तलखान्याचे लाल पाणी; विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात
By अरुण वाघमोडे | Updated: June 17, 2024 22:27 IST2024-06-17T22:26:57+5:302024-06-17T22:27:06+5:30
अहमदनगर : जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शहरातील स्टेशन रोडवरील अहमदनगर कॉलेजसमोरील सैनिकी मुलींच्या वसतिगृह परिसरात कत्तलखान्यातील लाल पाण्याचा ...

सैनिकी मुलींच्या वसतिगृहात कत्तलखान्याचे लाल पाणी; विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात
अहमदनगर : जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शहरातील स्टेशन रोडवरील अहमदनगर कॉलेजसमोरील सैनिकी मुलींच्या वसतिगृह परिसरात कत्तलखान्यातील लाल पाण्याचा डोह साचल्याने वसतिगृहातील विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्यासोबत वारंवार ॲनिमल वेस्टही वाहून येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
सैनिकी मुलींच्या वसतिगृहात सध्या ४५ मुली राहतात. या परिसरातून जाणारी ड्रेनेजलाईन झेंडी गेट परिसरातून येते. त्या परिसरात मोठ्या प्रमाणात कत्तलखाने आहेत. या कत्तलखान्याचे घाण पाणी आणि त्याच्यासोबतचे ॲनिमल वेस्ट ड्रेनेजमध्ये सोडले जाते. सैनिकी मुलींच्या वसतिगृह परिसरात ड्रेनेज तुंबले तर हे घाण पाणी थेट वसतिगृह परिसरात साचून परिसरात दुर्गंधी पसरते.
वर्षभरात हा प्रकार वारंवार घडत असल्याचे वसतिगृहाच्या अधीक्षक निर्मला हंडे यांनी सांगितले. दरम्यान, वसतिगृह परिसरात साचलेल्या घाण पाण्याबाबत वसतिगृहाच्या वतीने महापालिकेत तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तुंबलेले ड्रेनेज मोकळे केले. तेव्हा ड्रेनेजमध्ये म्हशीचे वासरू आढळून आले.