साठ टक्के रुग्णांना आधीपासूनच होते आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:45+5:302021-06-21T04:15:45+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत साडेपाच हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील ६० टक्के रुग्णांना आधीपासूनच वेगवेगळे आजार होते, ...

साठ टक्के रुग्णांना आधीपासूनच होते आजार
अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत साडेपाच हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील ६० टक्के रुग्णांना आधीपासूनच वेगवेगळे आजार होते, तर सहव्याधी नसलेल्या ४० टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. साडेपाच हजारांमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त पुरुषांचा, तर दीड हजारांपेक्षा जास्त महिलांचा मृत्यू झाला आहे. कोरोनासह सहव्याधी असलेल्या ३३०० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून, २२०० पेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजार नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांनाही कोरोनाने हिरावले आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त होते. रक्तातील साखर, रक्तदाब आदी सहव्याधी असलेल्या ६० टक्के रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यातील काही रुग्णांचा पहिल्या पाच दिवसांमध्येच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
-----
उपचाराच्या २४ तासांमध्ये दोनशेपेक्षा जास्त जणांचा मृत्यू
दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना २४ तास उपचार घेतल्यानंतर मृत्यू झाला, अशी रुग्णसंख्या दोनशेच्यावर आहे. एक ते पाच दिवस झाल्यानंतर एक हजार जणांचा, सहा ते दहा दिवसांच्या उपचारादरम्यान एक हजार जणांचा आणि दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार घेतल्यानंतर सातशेपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे.
--------
सहव्याधीपेक्षा कोरोनामुळेच अधिक मृत्यू
सहव्याधी असलेल्या ६० टक्के रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ४० टक्के रुग्णांना सहव्याधी नव्हत्या. म्हणजे रक्तामधील साखर, रक्तदाब व उच्च रक्तदाबाचे आजार नव्हते किंवा अन्य आजारही नव्हते. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४५ ते ५५ या वयोगटांतील नागरिकांचा जास्त समावेश आहे.
------------
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये कोणत्या आजारांमुळे किती जणांचा मृत्यू झाला, अशी निश्चित आकडेवारी समोर आलेली नसली, तरी ढोबळ मानाने मृत्यू झालेल्यांपैकी ६० टक्के नागरिकांना आधीपासूनच व्याधी असल्याचे दिसून आले आहे. रक्तातील साखर, रक्तदाब, आधी येऊन गेलेला हृदयविकारधक्का ही त्यामागील कारणे होती. वयापेक्षा जास्त वजन असणे म्हणजे लठ्ठपणा हेही अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. लठ्ठ असलेल्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचा दर जास्त होता.
-डॉ. सचिन वहाडणे, सचिव, आयएमए, अहमदनगर शाखा
---------
डमी