सोळाच गावे दुष्काळी
By Admin | Updated: October 22, 2015 21:17 IST2015-10-22T21:17:27+5:302015-10-22T21:17:27+5:30
राज्य सरकारने ५0 टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत. त्यात कोपरगाव तालुक्यातील केवळ सोळाच गावांचा समावेश आहे

सोळाच गावे दुष्काळी
कोपरगाव : राज्य सरकारने ५0 टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत. त्यात कोपरगाव तालुक्यातील केवळ सोळाच गावांचा समावेश आहे. वास्तविक तालुक्यातील सर्वच गावे सध्या दुष्काळाशी सामना करीत आहेत. तेव्हा उर्वरित सर्वच गावांत दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा कोणत्याही मंत्री व अधिकार्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात परजणे यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने महाराष्ट्रात १४ हजार ७0८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यासाठी ५0 टक्केपेक्षा कमी पैसेवारीचा निकष लावला आहे.
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव, ओगदी, नाटैगाव, आंचलगाव, शहाजापूर, जवळके, शहापूर, बहादरपूर, वेस, सोयगाव, धोंडेवाडी, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, मनेगाव, काकडी, मल्हारवाडी या सोळा गावांमध्येच दुष्काळ जाहीर केला.
,वास्तविक तालुक्यातील सर्वच गावे ५0 टक्क्यांहून कमी पैसेवारीमध्ये येत असून, शासकीय यंत्रणेने कोणत्या आधारावर सर्वेक्षण केले? उर्वरित ६३ गावांमध्ये दुष्काळ नाही का? असा सवाल करून परजणे पुढे म्हणाले, शासनाने सर्व गावांचे फेरसर्वेक्षण करून उर्वरित सर्व गावे दुष्काळी जाहीर करावीत, अन्यथा कोणत्याही मंत्र्याला अथवा अधिकार्यांना कोपरगाव तालुक्यात फिरू देणार नाही. (प्रतिनिधी)