कारखान्यातील स्फोटात सहा मजूर जखमी : सुपा एमआयडीसीतील दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 18:22 IST2019-01-09T18:22:13+5:302019-01-09T18:22:54+5:30
पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीमधील कारखान्यात झालेल्या स्फोटात सहा मजूर भाजून जखमी झाले.

कारखान्यातील स्फोटात सहा मजूर जखमी : सुपा एमआयडीसीतील दुर्घटना
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीमधील कारखान्यात झालेल्या स्फोटात सहा मजूर भाजून जखमी झाले. याबाबत मंगळवारी रात्री सायंकाळपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे सविस्तर अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार ८ जानेवारीस सकाळी सुपा एमआयडीसीमधील शुभम एंटरप्रायझेस या कारखान्यात ही दुर्घटना घडली. या कारखान्यात टायरपासून आॅईल तयार केले जाते.
टायर जाळून त्यापासून हे आॅईल काढले जाते. त्यासाठी असणाऱ्या टाकीचा स्फोट झाला. त्यामुळे तेथे काम करणारे मजूर भाजले. जखमी मजुरांना सुपा येथील खासगी दवाखान्यात तर काहींना तातडीने नगरला हलविण्यात आले.
जखमींमध्ये राजाराम बबन चेडे (रा.हंगा, ता. पारनेर), कमलेश सहाणे, लालदेव सहाणे व मोहन सहाणे यांचा समावेश आहे. चेडे हंगा येथील रहिवासी असून उर्वरित मजूर महाराष्ट्राबाहेरील असल्याचे समजते. तर चंदन व राम मोहन (पूर्ण नाव माहीत नाही) या नावाच्या कामगारांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत कोणीही पोलिसात फिर्याद दिलेली नव्हती.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता ती कंपनी बंद असून तेथे कुणीच माहीतगार उपस्थित नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुपा पोलिसांकडे यापेक्षा जास्त माहिती नव्हती. यापूर्वी सुपा एमआयडीसीत स्फोटाच्या घटना घडून परप्रांतीयांना जीव गमवावा लागला होता.