बहिणीच्या किडनीने भावाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 12:43 IST2019-03-05T12:43:32+5:302019-03-05T12:43:35+5:30
भावा-बहिणीच्या नात्यातील अनेक पैलू नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी एकमेकांसाठी केलेल्या त्यागाचीही अनेक उदाहरणे आहेत.

बहिणीच्या किडनीने भावाला जीवदान
कानिफनाथ गायकवाड
पळवे : भावा-बहिणीच्या नात्यातील अनेक पैलू नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी एकमेकांसाठी केलेल्या त्यागाचीही अनेक उदाहरणे आहेत. दोन्ही किडन्या निकाम्या झाल्याने मृत्यूच्या दारात असलेल्या भावाला वाचविण्यासाठी अशीच एक बहीण धावून आली. तिने आपल्या भावाला एक किडनी देऊन त्याला जीवदान दिले. तो भाऊ आता सर्वांसारखेच सामान्य जीवन जगत आहे.
ही घटना आहे, पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रूक येथील. रेश्मा व अमीर असे त्या बहिणभावाचे नाव आहे. वडील शब्बीर तांबोळी हातावरचे काम करून कुटुंब चालवतात. आई मोलमजुरी करते. त्यांना अकबर, अमीर ही दोन मुले, रेश्मा ही एक मुलगी आहे. अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. एक मुलगा नुकताच देशसेवेत दाखल झाला आहे. मुलीचे लग्न होऊन ती दोन मुलींसह श्रीगोंद्यातील भांडगाव येथे सासरी नांदते. आई-वडिलांना जेव्हा कळले की अमीरच्या दोन्ही किडन्या निकामी आहेत, तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी अतोनात प्रयत्न केले. कोठेही किडनीचे निदान होत नव्हते. यासाठी तब्बल सात-आठ लाख रुपये खर्च केल्याचे वडील शब्बीर तांबोळी यांनी सांगितले. अमीरचा भाऊ अकबर याचे मित्र, पाहुण्यांनी मोठी आर्थिक मदत केली. किडनी मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अमीरची तब्येत खालावत होती. उपचारासाठी त्याला पुणे येथे जावे लागत असे. उपजीविकेचे साधन व औषधोपचार याचा खर्च वडिलांना पेलवत नसल्याने सुशिक्षित अमीरने नगर-पुणे मार्गावर एक छोटेसे गॅरेज सुरू केले होते. हा व्यवसाय चांगला जोमात येत असतानाच अमीरची तब्येत दिवसेंदिवस खालावत जाऊ लागली. नाईलाजास्तव आजारपणामुळे गॅरेजही बंद करावे लागले. अमीर आजारी पडून पुणे येथे उपचार सुरु ठेवला. इकडे वडिलांनी अनेक संस्थांचे उंबरे झिजविले मात्र यश मिळाले नाही. मुख्य प्रश्न किडनी मिळण्याचा होता. तो काही सुटत नव्हता. अखेर बहीण रेश्मा हिने भावाच्या जीवासाठी आपली स्वत:ची किडनी देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी किडनीचे प्रत्यारोपण पुणे येथे यशस्वी झाले. आता अमीर आणि बहीण रेश्मा दोघेही सामान्य जीवन जगत आहेत.
सध्या पळवे परिसरात औद्योगिक वसाहतीचे वारे वाहत असल्याने पडित जमिनीलाही वीस लाखांपेक्षा जास्त दर मिळाला आहे. हा परिसर मोठा शेती खालचा आहे. प्रत्येक घराला चांगली जमीन आहे. भाव चांगला मिळू लागल्याने अनेक घरांतून लग्न करून गेलेल्या बहिणी हिस्सा मागू लागल्या आहेत. काहींनी दावे दाखल केले आहेत. अशा परिस्थितीत बहिणीने भावासाठी किडनी देऊन त्याचा जीव वाचविल्याची घटना घडली. त्यामुळे या बहिणीचे परिसरात कौतुक होत आहे.