सायरन..घबराट अन् सुटकेचा नि:श्वास
By Admin | Updated: August 10, 2016 00:24 IST2016-08-09T23:55:57+5:302016-08-10T00:24:24+5:30
शेवगाव : गजबजलेल्या बाजारपेठेतील मध्यवर्ती केंद्र असलेला शेवगावातील शिवाजी चौक. दुपारची साडेबाराची वेळ. परिसरात ग्राहक व

सायरन..घबराट अन् सुटकेचा नि:श्वास
शेवगाव : गजबजलेल्या बाजारपेठेतील मध्यवर्ती केंद्र असलेला शेवगावातील शिवाजी चौक. दुपारची साडेबाराची वेळ. परिसरात ग्राहक व ग्रामस्थांच्या गर्दीत अचानकपणे सायरन वाजवित पोलिसांच्या गाड्या दाखल झाल्या. त्यातून उतरलेला फौजफाटा. कुणाला काही कळण्याच्या आत त्यांनी गर्दी हटविण्याच्या कामाला सुरुवात केलेली. त्यामुळे चौकात जमलेल्या सर्वांच्याच मनात धाकधूक वाढलेली. प्रत्येकाचाच प्रश्न कुठं काय झालं?
कुठं काय झालं? या प्रश्नाने सर्वांना छळले असतानाच काही वेळातच नजिकच्या पाथर्डी, नेवासा, सोनई परिसरातून दाखल झालेला फौजफाटा. यामुळे परिसराचे वातावरण आणखीच धीरगंभीर बनले. मात्र काही वेळातच पोलीस पथकाचे दंगल नियंत्रणाचे हे प्रात्यक्षिक असल्याची माहिती समजताच सर्वांनीच सुटकेचा सुस्कारा सोडला. यामुळे क्षणात वातावरण बदलण्यास मदत झाली.
शेवगावच्या शिवाजी चौकात मंगळवारी दुपारी पोलीस दलाने दंगल नियंत्रण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तातडीच्या वेळी इतर सहकारी, सरकारी विभागांचे जबाबदार अधिकारी, कर्मचारी किती वेळेत घटनास्थळी दाखल होतात व आपले कर्तव्य बजावण्यात यशस्वी होतात? याची चाचणी घेतली. प्रशिक्षणार्थी तहसीलदार तुषार वाघ, निवासी नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, तहसील कार्यालयाचे शशिकांत देऊळगावकर, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक निरीक्षक बाबासाहेब चव्हाण या अधिकाऱ्यांसह महसूल, पोलीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी या लुटूपुटूच्या दंगल नियंत्रण प्रात्यक्षिकामध्ये सहभागी झाले होते. गुप्तवार्ता विभागाचे राजू चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. (तालुका प्रतिनिधी)