नगर तालुक्यात राजकीय घमासानाचे संकेत

By Admin | Updated: July 26, 2014 00:33 IST2014-07-25T23:09:27+5:302014-07-26T00:33:30+5:30

अहमदनगर : स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ नसतानाही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी श्रीगोंद्यातून, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष लामखडे यांनी पारनेरमधून लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Significance of political gossip in Nagar taluka | नगर तालुक्यात राजकीय घमासानाचे संकेत

नगर तालुक्यात राजकीय घमासानाचे संकेत

अहमदनगर : स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ नसतानाही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी श्रीगोंद्यातून, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव लामखडे यांनी पारनेरमधून तर राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी राहुरीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मोकाटे यांनी आ. शिवाजी कर्डिले यांच्यावर टिकास्त्र सोडत वेळप्रसंगी अपक्ष लढण्याचा इरादा स्पष्ट केल्याने मतदारसंघ नसतानाही नगर तालुक्यातही राजकीय घमासानाचे संकेत आहेत.
विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत नगर तालुका श्रीगोंदा, पारनेर व राहुरी मतदारसंघात विभागला गेला. परिणामी नगर तालुक्यातून कुणी आमदार होईल याच्याही आशा मावळल्या होत्या. राजकीय विश्लेषकांनीही नगर तालुक्याचा कुणी आमदार होईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र आ.कर्डिले यांची राहुरीतून खेळी यशस्वी झाल्यानंतर आता अनेकांनी असा डाव खेळण्यासाठी दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादीचे नगरचे पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी आ.कर्डिले यांच्यावर अकार्यक्षमतेचे आरोप करत राहुरीतून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर केला आहे. कर्डिले यांनी कुठलीच विकासकामे न करता तालुक्यातील सहकारी संस्था डबघाईला आणल्या असा आरोप मोकाटे यांनी केला. आपल्याला ५० गावातील सरपंचांचा आग्रह झाल्यानेच ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव लामखडे यांनीही पारनेरमधून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून लढण्याचा त्यांचा निर्णय ठाम आहे. नगर तालुक्यातील पारनेर मतदारसंघात येणाऱ्या सर्वपक्षीयांची मोट ते बांधत असून, आ. औटी यांच्यावरील नगर तालुक्यात असणारी युतीच्या कार्यकर्त्यांची नाराजी व शिवसैनिकांचे नुकतेच झालेले आंदोलन यामुळे लामखडे पारनेरची तयारी करीत आहेत.
श्रीगोंदा मतदारसंघाची युतीची जागा सध्या भाजपाकडे आहे. मात्र भाजपाकडे सध्या निवडून येण्याच्या पात्रतेचा एकही उमेदवार नाही. प्रत्येक वेळी भाजपाला येथे पराभवाचाच सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष घनशाम शेलार यांच्या प्रवेशाला जोरदार विरोध आहे. यामुळे ही जागा बदलून शिवसेनेला मिळावी यासाठी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व इतर सेना नेत्यांना साकडे घातले आहे. ही जागा सेनेला मिळाल्यास सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांची तेथून उमेदवारी करण्याची तयारी आहे. तशी तयारी व कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणीही त्यांनी सुरू केली आहे.
(प्रतिनिधी)
नगर तालुक्याच्या एकीची हाक
नगर तालुक्यातील मतदार एकसंघ राहिले तर तिनही आमदार आपले (नगर तालुक्याचे) होतील अशी भविष्यवाणी आ.कर्डिले यांनी केली आहे. मी जे राहुरीत करून दाखवले ते पारनेर व श्रीगोंद्यातही होऊ शकते, अशी तालुका एकीची हाक त्यांनी दिली खरी पण या एकीसमोर मोठे आव्हान कायम आहे. त्यात मोकाटे यांनीच राहुरीतून आव्हान उभे करण्याची तयारी चालवली आहे.

Web Title: Significance of political gossip in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.