प्रवरेच्या पाण्यावर भरारी पथकांची नजर
By Admin | Updated: July 15, 2014 00:46 IST2014-07-14T22:50:56+5:302014-07-15T00:46:06+5:30
संगमनेर : सद्यस्थितीतील टंचाईत निळवंडे धरणातून प्रवरा नदीत सोडलेल्या पाण्याचा अनधिकृत उपसा होवू नये म्हणून भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.

प्रवरेच्या पाण्यावर भरारी पथकांची नजर
संगमनेर : सद्यस्थितीतील टंचाईत निळवंडे धरणातून प्रवरा नदीत सोडलेल्या पाण्याचा अनधिकृत उपसा होवू नये म्हणून भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. ही पथके नदीपात्रावर लक्ष ठेवणार असल्याने उपसा करणारांवर कारवाई अपेक्षित आहे.
१४ ते १९ जुलै दरम्यान निळवंडे धरणातून पाच दिवसांचे पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. नदीपात्रातील पाण्यावर नियंत्रण न राहिल्याने विद्युत मोटारींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उपसा होतो. परिणामी पाणी श्रीरामपूरपर्यंत पोहचत नाही. अशावेळी पिण्याच्या पाण्याची गरज असूनही ते मिळत नाही. संभाव्य टंचाई लक्षात घेता नदी पात्रातील पाण्याचा अनधिकृत उपसा होवू नये म्हणून निळवंडे ते ओझर बंधाऱ्यास लागून असलेल्या प्रवरा डावा व उजव्या कालव्यांवर भरारी पथकांची नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. यात पाटबंधारे, महसूल, पोलीस, विद्यूत मंडळ, पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पथकांसाठी पाटबंधारे विभागाकडून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवर्तन काळात ही पथके नदी पात्रावर दिवसरात्र गस्त घालणार आहेत. अनाधिकृत पाण्याचा उपसा केल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई होईल. तर भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्याविरूध्द टंचाई मॅन्यूअल अधिनियम २००५ प्रमाणे कारवाई केली जाणार आहे.
टंचाईग्रस्त परिस्थती लक्षात घेता निळवंडे धरणातून पाच दिवसांचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत आहे. पाण्याचा अनाधिकृत उपसा होवू नये म्हणून एकूण ६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यात ४ पथके धांदरफळ बुद्रुक, मंगळापूर, संगमनेर शहर, ओझर बंधारा व पुढे, तर अकोले तालुक्यात २ पथके निळवंडे ते अकोले शहर, शहर ते कळस अशा पॉर्इंटवर लक्ष ठेवणार आहेत.
- संदीप निचित, प्रांताधिकारी