शेवगाव शहराला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:42+5:302021-07-16T04:15:42+5:30
शेवगाव : शहराला ग्रामीण भागाशी जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. विविध कामांसाठी गावातून शहराकडे येणाऱ्या दुचाकी ...

शेवगाव शहराला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची चाळण
शेवगाव : शहराला ग्रामीण भागाशी जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. विविध कामांसाठी गावातून शहराकडे येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहन चालक, प्रवाशांना खड्डे चुकवीत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नांत लहान-मोठे अपघातही होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
खराब झालेल्या रस्त्यांमुळे अनेकांना हाडांच्या व मणक्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. ग्रामीण भागातून खरेदीसाठी, शासकीय कार्यालयात विविध कामांच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबर बीड, औरंगाबाद, अहमदनगरसह पैठण, पाथर्डी, नेवासा, गेवराई, श्रीरामपूरकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. खराब रस्त्यांमुळे वाहनाचे नुकसान होत असून, इंधनाचा व वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे.
ग्रामीण भागातून शहरात येणारे सर्व रस्ते, तसेच शेजारील तालुक्यांना जोडणारे प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांचे शहरात येताना प्रचंड हाल होत आहेत. त्याचा परिणाम शेवगाव शहरातील बाजारपेठेतील उलाढाली होत आहे.
----
साईडपट्ट्या उखडल्या, झाडाझुडपांचा त्रास
रस्त्याच्या बाजूची माती वाहून गेल्याने साईडपट्ट्या उघड्या पडल्या आहेत. काही डांबरी रस्त्यांच्या साईडपट्ट्याही उखडल्या आहेत. त्या वाहनांसाठी धोकादायक ठरत असून, वाहने उलटण्याची भीती वाढली आहे. रस्ते अरुंद असल्याने अनेकदा समोरून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे छोटी वाहने रस्त्याच्या खाली उतरवून चालावी लागतात. त्यात पावसामुळे बाजूचे गवत, झाडेझुडपे वाढली आहेत. परिणामी समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
----
..अन्यथा सर्व रस्ते अडविणार
तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे काम होणे अपेक्षित होते. मात्र, आता आंदोलनाचा इशारा देताच पावसाचे कारण दिले जात आहे. वास्तविक, आसपासच्या शहरात भर पावसात रस्त्याची कामे सुरू आहेत. त्याच धर्तीवर तालुक्यातील रस्त्यांची पुनर्बांधणी करावी. रस्त्यांच्या डागडुजीवर अवास्तव खर्च न करता नव्याने रस्त्याच्या बांधणीचे काम हाती घ्यावे. अन्यथा सर्व रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा भाकपचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी दिला आहे.
----
फोटाे आहेत.