श्रीरामपूरची स्नेहल अव्वल
By Admin | Updated: June 8, 2014 00:35 IST2014-06-07T23:40:39+5:302014-06-08T00:35:17+5:30
अहमदनगर : आरोग्य संचालनालयाने घेतलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (एम. एच. सीईटी) श्रीरामपूरच्या बोरावके महाविद्यालयाच्या स्नेहल गोरख बारहाते हिने ५९६ गुण मिळवून

श्रीरामपूरची स्नेहल अव्वल
अहमदनगर : आरोग्य संचालनालयाने घेतलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (एम. एच. सीईटी) श्रीरामपूरच्या बोरावके महाविद्यालयाच्या स्नेहल गोरख बारहाते हिने ५९६ गुण मिळवून जिल्ह्यात अव्वल येण्याचा मान पटकाविला आहे. नगर शहरामध्ये अश्विन संजय पुंड याने ४७५ गुण मिळवून सरस कामगिरी केली आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या सीईटी निकालामध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे, असा दावा खासगी क्लासेसच्या संचालकांनी केला आहे.
बारावीनंतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी आरोग्य संचालनालयाने ८ मे रोजी प्रवेश परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आला आहे. सीईटीचे निकाल संकेतस्थळावरून थेट जाहीर झाल्याने कोणते विद्यार्थी टॉप ठरले, याबाबत महाविद्यालये आणि खासगी क्लासेसच्या संचालकांमध्ये संभ्रम आहे. तशी यादी तयार करण्यासही वेळ लागणार आहे, असे महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
मात्र ‘लोकमत’ने विविध खासगी क्लासेसच्या संचालकांशी संपर्क साधला असता श्रीरामपूरची स्नेहल बारहाते हीच अव्वल ठरली आहे. तिला ७२० पैकी ५९६ गुण मिळाले आहेत.
बारावीच्या परीक्षेत तिला ९५ टक्के गुण मिळाले आहेत. स्नेहल हिला रसायनशास्त्रामध्ये १४८ गुण, जीवशास्त्रामध्ये ३३२ गुण आणि भौतिकशास्त्रामध्ये ११६ गुण मिळाले आहेत. त्यामुळे पहिल्या दोन विषयांमध्येही ती पहिली असल्याचा दावा तिचे श्रीरामपूर येथील खासगी क्लासेसचे संचालक प्रमोद निर्मळ यांनी केला आहे. स्नेहलच्या खालोखाल ४८५ ते ४९० गुण मिळालेले श्रीरामपूर येथील आणखी पाच ते सहा विद्यार्थी आहेत. सावेडीतील मकर गुरशीन, शौनक तुवर, आदित्य रहाणे यांनीही या परीक्षेत उज्ज्वल कामगिरी केली आहे, असे प्रा. रवींद्र काळे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
गतवर्षी सीईटीमध्ये नगरच्या विद्यार्थ्यांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. यंदा मात्र सीईटीच्या निकालात नगरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. फ्रेश विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. सीईटीच्या निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. - प्रा. गंगाधर चिंधे, सावेडी