श्रीगोंद्याची नटरंगी नार उडवणार राजकारणात बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST2021-09-15T04:25:46+5:302021-09-15T04:25:46+5:30
श्रीगोंदा : नटरंगी उडवी लावणीचा बार कार्यक्रमातून लावणी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेली श्रीगोंद्याची कन्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आता ...

श्रीगोंद्याची नटरंगी नार उडवणार राजकारणात बार
श्रीगोंदा : नटरंगी उडवी लावणीचा बार कार्यक्रमातून लावणी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेली श्रीगोंद्याची कन्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आता राजकारणात बार उडविणार आहे. लवकरच पुणेकर या इतर कलाकारांसह १६ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
सुरेखा पुणेकर या मूळच्या टाकळी कडेवळीत (ता. श्रीगोंदा) येथील रणशिंग कुटुंबातील आहेत. लावणीला जागतिक पातळीवर नेण्यात सुरेखा पुणेकर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. तमाशाच्या माध्यमातून गावोगाव लोकांची मने जिंकण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून त्या करीत आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. आता त्या राजकीय फडावर एन्ट्री करणार असून, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्या राजकीय पटलावर नशीब अजमावणार आहेत. लवकरच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.
काही दिवसांपूर्वी सुरेखा पुणेकर यांना विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून निवडणूक लढविण्याची ऑफर होती. मात्र, त्यांनी शिवसंग्राममध्ये प्रवेश केला नाही. याआधीही प्रिया बेर्डे, विजय भाटकर, आनंद शिंदे यांच्यासह अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.