श्रीगोंद्याला कुकडीचे मिळणार अवघे नऊ दिवस पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:02+5:302021-02-05T06:34:02+5:30
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले आहे. ४० दिवसांच्या आवर्तनात कर्जत १२, श्रीगोंदा, करमाळा ...

श्रीगोंद्याला कुकडीचे मिळणार अवघे नऊ दिवस पाणी
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले आहे. ४० दिवसांच्या आवर्तनात कर्जत १२, श्रीगोंदा, करमाळा प्रत्येकी ९ दिवस तर नारायणगाव, पारनेर ३ दिवस याप्रमाणे अधिकाऱ्यांनी आवर्तनाचे नियोजन केले आहे. सर्वाधिक लाभक्षेत्र असलेल्या श्रीगोंदा तालुक्याला अवघे नऊ दिवस पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
अल्पकाळ पाणी मिळाल्यास श्रीगोंदा तालुक्यातील पिकांची होळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रीगोंदा येथे उपअभियंता अविनाश फडतरे यांच्या उपस्थितीत कुकडी जोड कालवा १३२ खालील शेतकऱ्यांची पाणी नियोजनासंदर्भात २९ पाणी वापर संस्था प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी कोणत्या तालुक्याला किती पाणी मिळेल, याबाबत वेळापत्रक सांगितले. त्यात तालुक्यातला अवघे नऊ दिवस पाणी मिळणार असल्याचे समजताच ‘साहेब आम्हाला पाणी नको’, असे म्हणत पाणी वापर संस्थेचे प्रतिनिधी, शेतकरी यांनी सभात्याग केला. उद्या पुन्हा बैठक घेऊ असे म्हणत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. केवळ शासनाच्या नादानपणामुळे कुकडीच्या लाभक्षेत्रात पाण्याची बोंबाबोंब सुरू झाली आहे, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
श्रीगोंदा तालुक्यास २८ फेब्रुवारीपासून ९ दिवस आवर्तन देण्यात येणार आहे. पारनेरला शेवटी तीन दिवस आवर्तन देण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर काही शेतकऱ्यांनी पारनेर तालुक्यातील चाऱ्यांना पाणी सुरू आहे, असे मोबाइलवर दाखविले. त्यावेळी अधिकारी निरुत्तर झाले.
----
कुकडी प्रकल्पात श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात जादा क्षेत्र सिंचनाखाली येते. यापूर्वी २०-२२ दिवस पाणी दिले. आता ९ दिवसांत कशी भरणी होतील. हा अन्याय सहन करणार नाही. दि. १० फेब्रुवारीनंतर श्रीगोंदा तालुक्यातील सर्व चाऱ्या उघडू.
-नंदकुमार कोकाटे,
भाजप नेते
-----