श्रीगोंदेकरांना आता मुबलक पाणी
By Admin | Updated: April 22, 2016 00:13 IST2016-04-22T00:07:41+5:302016-04-22T00:13:49+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे.

श्रीगोंदेकरांना आता मुबलक पाणी
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे घोड धरणावरून आणलेल्या पाणी योजनेतून रोज २५ टँकरच्या मदतीने आठ ते दहा लाख लीटर पाणी शहर व परिसरातील वाड्या-वस्त्यांना पुरविले जाते. तसेच नवीन फिल्टर हाऊस ते जुन्या फिल्टर हाऊसपर्यंतच्या पाईपलाईनचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण होऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती नगराध्यक्ष छाया गोरे यांनी दिली.
गोरे म्हणाल्या, शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची जाणीव पालिका प्रशासनाला आहे.माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन वेळू तलावात कुकडीचे पाणी सोडण्याची विनंती केल. त्यामुळे वेळू तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच घोड धरणावरून नवीन योजनेतून पाणी आणले आहे. हे पाणी सध्या नवीन फिल्टर हाऊसमध्ये आणले आहे. याठिकाणी शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी रोज २५ टँकर भरले जातात. यातून वाड्या-वस्त्यांना पाणी दिले जाते.
सध्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवीन फिल्टर हाऊस ते जुने फिल्टर हाऊस या दरम्यान पाईप लाईनचे काम चालू असून येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला. शहरातील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पालिका पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी प्रयत्नशील आहेत. टंचाईस्थितीमुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही गोरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)