अकोले : गणेश उत्सवासाठी नगरपंचायत प्रशासन सज्ज झाले २९४ मंडळांकडून श्री प्रतिष्ठापनाअसून मिरवणूक मार्गाची डागडूजी, चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदी कामाला सुरूवात झाली आहे. अकोलेकरांनी वाजत गाजत गणराजाचे स्वागत केले. शहरात ३७ गणेश मंडळांनी गणेश स्थापना केली असून तालुक्यात ७७ गावांत एक गाव एक गणपती आहे.तालुक्यात एकूण २९४ गणपती मंडळांनी गणेश स्थापना केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे, पोलीस निरीक्षक नारायण वाखारे, देखावा स्पर्धेचे निरीक्षक गट शिक्षणाधिकारी परशुराम पावसे, विस्तार अधिकारी राजेश पावसे यांनी शांतता कमेटी बैठकीत गणपती मंडळांचा आढावा घेतला.पर्यटन व सांस्कतिक कला विभागाकडून पर्यावरणपूरक गणपती आरास स्पर्धा घेतली जात आहे. विभाग, जिल्हा व तालुका पातळीवरील या स्पर्धा आहेत. तालुक्यात धर्मदाय आयुक्त कार्यलयाकडे नोंदणीकृत असलेले केवळ सात गणपती मंडळे आहेत पैकी चार मंडळांनी ‘आरास’देखावा स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणपती मंडळांची निवड करुन बक्षीस दिले जाणार आहे. जिल्ह्यात प्रथम तीन मंडळांसाठी अनुक्रमे ५०, ४०, ३० हजार रुपये बक्षीस आहेत. दरम्यान, नवीन शासकीय परिपत्रकानुसार स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्व परवानगी घेऊन गणपती उत्सवात सहभागी झालेल्या मंडळांना देखील या ‘आरास’ स्पर्धेत भाग घेता येईल, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी परशुराम पावसे यांनी दिली. शासनाने प्रबोधन आराससाठी विषय ठरवून दिले आहेत. ही माहिती पंचायत समिती गट शिक्षण विभागाकडे असून परिक्षणही शिक्षण विभाग करणार आहे. सर्धेत सहभागी होण्यासाठी सात सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज गणपती मंडळानी गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार मनोज देशमुख व पोलीस निरीक्षक नारायण वाखारे, गट शिक्षण अधिकारी परशुराम पावसे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
२९४ मंडळांकडून श्री प्रतिष्ठापना
By admin | Updated: September 7, 2016 00:36 IST