चारा छावणीला कारणे दाखवा
By Admin | Updated: May 17, 2016 23:57 IST2016-05-17T23:57:35+5:302016-05-17T23:57:37+5:30
अहमदनगर : श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांच्या कुकडी सहकारी साखर काखान्याने चालविण्यास घेतलेल्या चिंभळी गावातील छावणी बंद करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे़

चारा छावणीला कारणे दाखवा
अहमदनगर : श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांच्या कुकडी सहकारी साखर काखान्याने चालविण्यास घेतलेल्या चिंभळी गावातील छावणी बंद करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे़ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत जनावरांच्या नोंदवहीसह इतर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली़ त्यामुळे कुकडी साखर कारखाना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
जनावरांसाठी सरकारने नगर जिल्ह्यात छावण्या सुरू करण्यास परवानगी दिली़ गेल्या एप्रिल महिन्यात जिल्ह्यात छावण्या सुरू झाल्या आहेत़ छावण्यांची संख्या २७ वर पोहोचली़ जिल्ह्यातील २२ हजार जनावरे छावणीच्या दावणीला बांधण्यात आली आहेत़ सरकारकडून छावण्यांसाठी २ कोटी ५५ लाखांचे अनुदानही प्राप्त झाले आहे़ अनुदान वाटप करण्यापूर्वी छावण्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे़ श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळी गावातील छावणीला या पथकाने भेट दिली असता, जनावरांची नोंदवही भरलेली नव्हती. जनावरांना पिवळे व लाल बिल्ले न लावणे, सीसीटीव्ही न बसविणे यांसारख्या ८ त्रुटी आढळून आल्या आहेत़ सरकारच्या नियमानुसार कार्यवाही केली नसल्याचा अहवाल दिला आहे़ त्याआधारे प्रशासनाने छावणी चालक, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना आपली छावणी बंद का करू नये, अशी नोटीस बजावली आहे़ जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असून, त्रुटी असलेल्या छावण्यांना अशाप्रकारच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत़ चारा छावण्यांतील घोटाळा जिल्ह्यासाठी नवीन नाही़ सन २०१३ मध्ये जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या़ त्यावेळी छावण्यांतील चारा घोटाळा राज्यभर गाजला होता़ या प्रकरणाची चौकशी सुरूच आहे़ छावण्यांचा अनुभव वाईट असल्याने प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे़ तपासणीची मोहीम प्रशासनाने उघडली आहे़
प्रशासनाचे नियमांवर बोट
जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या छावण्यांची तपासणी करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत़ छावणीसाठी विविध प्रकारच्या ४४ अटी आहेत़ त्याची प्रत्यक्षात पुर्तता छावणी चालकांनी केली आहे किंवा नाही, याची तपासणी पथकाडून करण्यात येत आहे़ छावण्यांची पाहणी करून तहसीलदारांच्या पथकाने अहवाल तयार केले आहेत़ त्यांनी ते जिल्हा प्रशासनास सादर केले आहेत़ त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे़ अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या छावण्यांना अनुदान वितरीत करण्यात येणार ंअसल्याने छावणी चालकांची मोठी अडचण झाली आहे़