नगर बाजार समितीला कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:49+5:302021-09-10T04:27:49+5:30
केडगाव : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित गैरव्यवहाराबाबत महाविकास आघाडीने पणन संचालकांकडे दाद मागितली होती. त्यावर एस. ...

नगर बाजार समितीला कारणे दाखवा नोटीस
केडगाव : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित गैरव्यवहाराबाबत महाविकास आघाडीने पणन संचालकांकडे दाद मागितली होती. त्यावर एस. डी. सूर्यवंशी आणि गणेश पुरी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून बाजार समितीला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, असे म्हणत यामुळे बाजार समितीमधील भ्रष्ट कारभार उघड झाल्याची टीका महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, गोविंद मोकटे, पंचायत समिती सभापती संदीप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती रामदास भोर, गुलाब शिंदे, विठ्ठल काळे, तालुका प्रमुख राजू भगत, राष्ट्रवादीचे केशव बेरड आदी उपस्थित होते.
संदेश कार्ले म्हणाले, महाविकास आघाडीने आजवर वेळोवेळी केलेल्या मागणीच्या आधारे शासनाने चौकशी केली. चौकशीमध्ये अनेक ठिकाणी करोडो रुपयांची अनियमितता आढळून आलेली आहे. चौकशीसाठी समितीला बाजार समितीने अपूर्ण कागदपत्रे दिली. मासिक सभांना हजर नसताना प्रवास भत्ता घेतला गेला. अनधिकृत बांधकामे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांसह अनेक मुद्यांमध्ये घोटाळे झाल्याचे चौकशी समितीला आढळून आले आहे.
गोविंद मोकाटे म्हणाले की,५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाला असून, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे चक्र यांचे सुरू आहे. संचालक मंडळ लवकरच जेलमध्ये जाईल. बाळासाहेब हराळ यांनी पाच वर्षाचे स्पेशल ऑडीट शासनाने करावे म्हणजे अनेक गंभीर प्रकार समोर येतील. बाजार समितीने चौकशी समितीला कागदपत्रे पण उपलब्ध करून दिली नाहीत. ती का दिली नाहीत, याचे संशोधन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. स्पेशल ऑडिटची मागणी आम्ही शासनाकडे करणार असल्याचे सांगितले.
------
आम्हाला कोणतीच कारणे दाखवा नोटीस मिळाली नाही. आमच्याआधी विरोधकांच्या हातात ती नोटीस कशी पडली. सत्तेचा गैरवापर करून अशा नोटीसा पाठविल्या असल्या तरी नगर तालुक्यातील जनता सर्व सत्य जाणून आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर उत्तर देऊ.
-अभिलाष घिगे,
सभापती, बाजार समिती, नगर.