श्रीरामपूर पालिकेतील दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:37 IST2020-12-15T04:37:03+5:302020-12-15T04:37:03+5:30
पंधरा दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी कामावर हजर होताच बेशिस्तीला चाप लावला. मुख्याधिकारी ढेरे हे सकाळी कार्यालयीन वेळेत कामावर ...

श्रीरामपूर पालिकेतील दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
पंधरा दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी कामावर हजर होताच बेशिस्तीला चाप लावला. मुख्याधिकारी ढेरे हे सकाळी कार्यालयीन वेळेत कामावर आले. त्यावेळी त्यांनी बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा, अतिक्रमण अशा विविध विभागांतील उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांची स्वत: माहिती घेतली. यात तब्बल ३७ जण कार्यालयात वेळेवर आढळून आले नाहीत. त्यानंतर हा प्रकार पाहून मुख्याधिकारी संतप्त झाले.
कर्मचाऱ्यांनी कामावर सकाळी हजर राहावे. तसे आढळून आले नाही तर ती गैरहजेरी धरली जाईल. कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. नागरिकांना अडचण होईल, असे वर्तन कोणीही करू नये, असे मुख्याधिकारी ढेरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, कामावर परतल्यानंतर सर्व विभागांचा आपण स्वत: आढावा घेत आहोत. पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्याची तातडीने करावयाची कामे पाहत असल्याचे ढेरे यांनी सांगितले. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या घनकचरा व्यवस्थापनाची निविदा प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. गेल्या पंधरा दिवसांमध्ये हे काम रखडले होते. त्यावर तातडीने कार्यवाही करू, असे मुख्याधिकारी ढेरे म्हणाले.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सर्वसाधारण सभांमधून नगरसेवक अनेकदा नाराजी व्यक्त करतात. मात्र, आता मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने बेशिस्तीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.