धक्काबुक्की, शिवीगाळ, घोषणाबाजीने सभा गाजली
By Admin | Updated: June 30, 2014 00:35 IST2014-06-29T23:34:09+5:302014-06-30T00:35:39+5:30
अहमदनगर : जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या रविवारची वार्षिक सभा धक्काबुक्की, शिवीगाळ, शिवराळ भाषा, घोषणाबाजीनेच गाजली.
धक्काबुक्की, शिवीगाळ, घोषणाबाजीने सभा गाजली
अहमदनगर : जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या रविवारची वार्षिक सभा धक्काबुक्की, शिवीगाळ, शिवराळ भाषा, घोषणाबाजीनेच गाजली. सर्व विषय गोंधळातच मंजूर झाले. मागील वर्षांपासून सुरू झालेल्या शांततेच्या प्रथेस यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्या समर्थक शिक्षकांनी हरताळ फासत अक्षरश: व्यासपीठावर येऊन गोंधळ घालत एकमेकांची ऊणी-दुणी काढली.
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची ७१ वी वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष विष्णू शेकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सुरुवातीला प्रास्ताविकातून शेकडे यांनी संस्थेचा कारभार काटकसरीने सुरू असल्याचे सांगितले. यावर महेश दरेकर या सभासदाने आक्षेप घेत संस्थेत काटकसर नाही तर उधळपट्टी चालू असल्याचा आरोप केला. तसेच सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे अध्यक्षांनीच द्यावीत, ज्येष्ठ संचालक व सत्ताधारी गटाचे नेते प्रा.भाऊसाहेब कचरे यांनी देऊ नयेत, अशी मागणी विरोधी प्रगत, सहकार मंडळाच्या समर्थकांनी केली. यानंतर राजेंद्र लांडे यांनी कृतज्ञता निधीच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले कृतज्ञता निधीत ५८ लाखांची शिल्लक असताना अजूनही निधी जमा कशासाठी करता? यावर प्रा.कचरे खुलासा करण्यास उठले असता सभासदांनी गोंधळ घातला. विरोधकांनी त्यांनी खुलासा करण्यास विरोध करून अध्यक्षांनी बोलावे अशी मागणी केली. प्रा.कचरे मी संचालक नाही का? असा प्रति प्रश्न करून खुलासा केला. ही भविष्यातील तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर बाबासाहेब बोडखे यांनी अपंग सभासद किंवा त्यांच्या अपंग पाल्यासाठी संस्था काय उपाययोजना करते? असा प्रश्न केला. तसेच नोकरभरतीत कुणाचे किती नातेवाईक भरले याचे उत्तर द्यावेत, अशी मागणी केली. यावर प्रा.कचरे म्हणाले की, अपंगाच्या व्याजाच्या सवलतीबाबत आम्ही सहकार उपनिबंधकाकडे अहवाल पाठवला. मात्र तो नामंजूर झाला. नोकर भरतीत २० पैकी १९ कर्मचारी हे सभासदांच्या नात्यामधूनच घेतल्याचा खुलासा केला.
विरोधी गटाचे नेते आप्पासाहेब शिंदे यांनी संस्था काटकसरीच्या कारभाराचा आव आणते आणि अवाढव्य खर्च करते असा आरोप करत कर्ज मर्यादा वाढविण्याची मागणी केली. प्रा.कचरे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी कराव्या लागणाऱ्या अत्यावश्यक खर्चाची माहिती सभेत दिली. भिमराज खोसे व विरोधी संचालक प्रा. सुभाष कडलग यांनी लेखा परीक्षक नेमणुकीत काहीतरी आर्थिक व्यवहार होत असल्याचा थेट आरोप सत्ताधाऱ्यांवर केल्याने गोंधळ उडाला. संचालक मंडळाची मुदत संपल्याने संचालक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचा खुलासा प्रा. कचरे यांनी केला. यानंतर मारूती लांडगे, प्राचार्य सुनील पंडित, शाम पटारे, रमजान हवालदार आदींनी ही सभेतील चर्चेत भाग घेतला. आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपामुळे सत्ताधारी व विरोधक सभासद आमने-सामने आल्याने घोषणाबाजी झाली. व्यासपीठावरही काही सभासदांनी येऊन गोंधळ घातला. पोलिसांनाही धक्काबुक्की करीत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अशा गोंधळातच सर्व विषय मंजूर करण्यात आले. (प्रतिनिधी)
दोन्हीही गटाकडून झाले चित्रीकरण
सभेत विरोधकच गोंधळ घालतात असा दरवेळी आमच्यावर आरोप होतो म्हणून आम्ही यावेळी सभेचे चित्रीकरण केले. सभेत गोंधळ विरोधक नव्हे तर सत्ताधारी संचालकांचे समर्थक घालतात हे दाखवून देण्यासठी दरवर्षी चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे प्रा. सुभाष कडलग यांनी सांगितले.
कचरे यांनीच दिली उत्तरे
सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे प्रा. कचरे यांनी नव्हे तर अध्यक्षांनी द्यावीत असा विरोधकांचा आग्रह दुर्लक्षीत करून प्रा. कचरे यांनी सर्व सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी काही सभासदांनी संस्थेच्या कारभाराचे कौतुकही केले.