मराठी गीतांवर जल्लोष
By Admin | Updated: September 2, 2014 23:58 IST2014-09-02T23:38:22+5:302014-09-02T23:58:21+5:30
उत्साहवर्धक वातावरणात संगमनेर फेस्टीवलचा तिसरा दिवस गाजला.

मराठी गीतांवर जल्लोष
संगमनेर : क्षणाक्षणाला टाळ्यांचा कडकडाट... शिट्यांचा घुमणारा आवाज... गणपती बाप्पाच्या जयजयकारासह मराठमोळ्या गीतांवर होणारा जल्लोष... अशा उत्साहवर्धक वातावरणात संगमनेर फेस्टीवलचा तिसरा दिवस गाजला.
राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित फेस्टीवलच्या तिसऱ्या दिवसाचा प्रारंभ शहरातील वास्तूविशारदांच्या हस्ते श्रींची आरती करून झाला. आजच्या नृत्य स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या ३८ संघांनी सहभाग नोंदविला. श्रीरामपूरच्या डी. जे. बॉईज संघाने बहारदार नृत्याविष्काराद्वारे सादर केलेल्या विविध कसरतींची प्रात्यक्षिके पाहून प्रेक्षक भारावून गेले.
उत्कृष्ट वेशभूषा, साजेशी रंगछटा, परस्परांशी समन्वय, जलद व अचूक हालचाली, उत्कृष्ट पददालित्य अशा अष्टपैलू शैलीने सादर केलेल्या नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. या संघाला रोख ७ हजार व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संगमनेर दंत महाविद्यालयाच्या संघाने बालकांच्या कुपोषणावर आधारीत संकल्पनेवर सामाजिक संदेश दिला.
सादरीकरणात प्रत्येक स्पर्धक आपल्या भूमिकेशी समरस झाला होता. या संघास द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. संगमनेर महाविद्यालयाच्या कोमल फापाळे संघाने पारंपरिक नृत्यप्रकार सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. या संघास तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. वर्णम नृत्य अकादमीचे भरतनाट्यम, बी बॉईज व डी. माक्स संघांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. उत्तम संकल्पनेचे प्रथम बक्षीस अहमदनगरच्या के.व्ही.एस, तर दुसरे बक्षीस स्टार अँगल अकादमीच्या संघाने पटकावले. उत्तम वेशभूषेसाठी ध्रुवच्या स्टार ग्रूप व नटरंग अकादमीने अनुक्रमे पहिले व दुसरे बक्षीस प्राप्त केले.
स्वदेश प्रॉपर्टीचे संचालक बाळासाहेब देशमाने, नारायण अभंग, नवनीत कोठारी, श्रीनिवास भंडारी, संतोष करवा, सिध्दार्थ ओहरा यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी रोहित मणियार, सागर मणियार, संकेत कलंत्री, सुदर्शन नावंदर, गणेश मालाणी, सुरज डागा, राजेश मालपाणी, सचिन पलोड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नेहा सराफ यांनी करून आभार मानले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती. (प्रतिनिधी)