वादळामुळे शॉटसर्किट : १८ शेळ्या दगावल्या, दोन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 17:35 IST2018-06-06T17:34:25+5:302018-06-06T17:35:55+5:30
पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळात विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होऊन शेडमध्ये वीज प्रवाह उतरून अठरा शेळ्या दगावल्या.

वादळामुळे शॉटसर्किट : १८ शेळ्या दगावल्या, दोन लाखांचे नुकसान
टाकळी ढोकेश्वर(जि.अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळात विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होऊन शेडमध्ये वीज प्रवाह उतरून अठरा शेळ्या दगावल्या.
ही वीजवाहक तार पत्र्यावर पडल्याने तारेचा वीजप्रवाह शेडखालील लोखंडी जाळीत उतरला होता. त्यामुळे विजेचा धक्का बसून शेडमधील अठरा शेळ्या दगावल्याने सुरेश जगन्नाथ साळवे यांचा संसार उघड्यावर पडला. त्यामुळे त्यांना मोठी मदत करण्याची गरज आहे. बुधवारी रात्री दोनच्या दरम्यान जोरात वादळ सुटले होते. त्यात विजेच्या खांबावरील वीजवाहक तारांचे शॉर्टसर्किट होऊन साळवे यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडवर तार पडल्याने वीजप्रवाह शेडखालील लोखंडी जाळीत उतरून शेडमधील अठरा शेळ्या जागेवरच दगावल्या. साळवे यांचा सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळी पालनावरच अवलंबून होता. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेनंतर बुधवारी सकाळी वनकुटे परिसराचे महसूल मंडलाधिकारी शरद झावरे, तलाठी डी. टी. सोबले, सरपंच राहुल झावरे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी झाली होती.