धक्कादायक.. अंत्यविधीसाठी प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST2021-04-08T04:21:35+5:302021-04-08T04:21:35+5:30
अहमदनगर : कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा बुधवारी अचानक वाढला. त्यामुळे अंत्यविधीसाठी अमरधाम येथे दिवसभर वेटिंग होती. अंत्यविधीसाठी नातेवाइकांना रात्री उशिरापर्यंत ...

धक्कादायक.. अंत्यविधीसाठी प्रतीक्षा
अहमदनगर : कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा बुधवारी अचानक वाढला. त्यामुळे अंत्यविधीसाठी अमरधाम येथे दिवसभर वेटिंग होती. अंत्यविधीसाठी नातेवाइकांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागले. अंत्यविधीसाठी नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागल्याची ही पहिलीच घटना आहे.
कोरोनाबाधित रुग्णांचा अकडा बुधवारी काहीसा कमी झाला. रुग्णसंख्या घटली असली तरी मृतांचा आकडा वाढला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा आकडा मंगळवारी १३ होता. दुसऱ्या दिवशी बुधवारी हा अकडा अचानक वाढला. कोरोनाबाधितांवर येथील अमरधाममध्ये अंत्यविधी केला जातो. त्यासाठी महापालिकेने दोन विद्युत दाहिन्यांची व्यवस्था केलेली आहे. साधारणपणे एका मृतदेहासाठी दीड तासांचा कालावधी लागतो. सकाळी १० वाजता दोन्ही विद्युत दाहिन्या सुरू करण्यात आल्या होत्या. सायंकाळी सहा वाजेपर्यंत १४ मृतदेहांवर अंत्यविधी केला गेला. अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या जास्त असल्याने नातेवाईकही अमरधाम बाहेर ताटकळत उभे होते. काही नातेवाइकांनी फोन करून अंत्यविधीसाठी वेळ लागत असल्याची तक्रार केली. नातेवाईक म्हणाले, की रात्री मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, दुपारचे दोन वाजले. परंतु, अद्याप अंत्यविधी झालेला नाही. याबाबत विचारले असता तेथे आधीच काही डेड बॉडीवर अंत्यविधी झाले नसल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. याबाबत जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, पोर्टलवर मागील २४ तासांत झालेल्या मृतांची नोंद होते. त्यानुसार माहिती प्रसिद्ध केली गेली. बुधवारी झालेल्या मृतांची नोंद झाली नसावी. त्यामुळे नेमके किती जणांचा मत्यू झाला ते सांगता येणार नाही.
......
दाेन विद्युत दाहिन्या असूनही लागतोय वेळ
कोरोनाच्या पहिल्या लाटेत अंत्यविधीसाठी विलंब होत होता. त्यामुळे महापालिकेने आणखी एक विद्युत दाहिनी बसविली. परंतु, मृतांचा आकडा वाढल्यामुळे अंत्यविधीसाठी वेळ लागत आहे. मृत व्यक्ती ग्रामीण भागातील असतात. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जात नाही. अंत्यविधीसाठी ग्रामीण भागातून नातेवाईक येतात. परंतु, त्यांना माहिती मिळत नाही. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो.
----------------
बुधवारी १६५२ नवे बाधित
जिल्ह्यात बुधवारी १६५२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तर जिल्हा रुग्णालयात एकाच दिवसात १० ते १५ जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र त्याची पोर्टलवर बुधवारी नोंद झाली नव्हती. त्यामुळे बुधवारच्या आकडेवारीत एकही मृत्यू झालेला नसल्याचे म्हटले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ४५८, खासगी प्रयोगशाळेत ४९२ आणि अँटिजेन चाचणीत ७०२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर बुधवारी १६८० जणांना घरी सोडण्यात आले. आता एकूण रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार १६८ इतकी झाली आहे.