अहिल्यानगर: राहुरी शहर हद्दीत राहुरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदीपात्रात सोमवारी दुपारच्या दरम्यान एका नग्न अवस्थेत असलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत राहुरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदीपात्रात पानाडामध्ये मृतदेह आढळून आला. हा मृतदेह नग्न व कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेह महिलेचा की पुरुषाचा हे अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहायक फौजदार तुळशीदास गीते, हवालदार संदीप ठाणगे, आजिनाथ पाखरे, अशोक शिंदे, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, सतीश कुन्हाडे, अंकुश भोसले आदी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली.
दरम्यान, मृतदेह कोणाचा आहे, यात काही घातपात झाला आहे का? याबाबतचे प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन महिन्यांपूर्वी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात अशाच प्रकारे एका अनोळखी तरुणाचा घातपात करून मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने त्या तपासाला खीळ बसली. आता पुन्हा एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.