अहिल्यानगरः मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडतात. मात्र, चुलत्यासमोरच पुतणीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १९) रात्री आठ वाजेच्या सुमारास अहिल्यानगरमध्ये घडली. याप्रकरणी एकावर तोफखाना पोलिस ठाण्यात शुक्रवारी विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
योगेश दातरंगे असे गुन्हा झालेल्या इसमाचे नाव आहे. बुधवारी रात्री चुलते दोघी पुतण्यांना घेऊन कुल्फी खाण्यासाठी गेले होते. ते मोटारसायकलवरून घराकडे परत येत असताना आरोपींनी त्यांच्या दुचाकीला कार आडवी लावली. कारमधून खाली उतरून आरोपीने फिर्यादीला थांबण्याचा इशारा केला व दुचाकीला लाथ मारली. तसेच दुचाकीवर दगड घालून लोखंडी रॉड घेऊन आरोपी फिर्यादीस मारण्यास धावला. त्यामुळे फिर्यादी तेथून पुढे पळाले असता आरोपीने पीडितेचा हात पकडला. तू माझ्यासोबत चल, असे म्हणत पीडितेचा हात पकडून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडितेच्या आवाजाने परिसरातील नागरिक जमले. त्यामुळे आरोपी पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.