रविवारी प्रत्येक गावात उभारणार शिवस्वराज्य गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:26+5:302021-06-03T04:16:26+5:30
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आणि जीवनचरित्राचा जागर व्हावा यासाठी राज्य सरकारने शिव स्वराज्य दिन साजरा ...

रविवारी प्रत्येक गावात उभारणार शिवस्वराज्य गुढी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आणि जीवनचरित्राचा जागर व्हावा यासाठी राज्य सरकारने शिव स्वराज्य दिन साजरा करण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील ३० हजार ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा प्रशासनाच्या सर्व प्रमुख कार्यालयांच्या ठिकाणी यादिवशी गुढी उभारली जाणार आहे. गुढी समोर सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांनी नतमस्तक होऊन शिवरायांचे स्मरण करावे, महाराष्ट्र गीत, राष्ट्रगीत, शिवरायांचे विचार मांडावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने नगर जिल्ह्यातही हा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हा उत्सव साजरा करणार आहेत.
योगायोगाने नगरचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री असल्याने या विभागाचा मुख्य कार्यक्रम नगरला जिल्हा परिषदेत होणार आहे. त्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू आहे.
दि. ६ जून रोजी सकाळी ९ वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात शिवस्वराज्य दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, सभापती सुनील गडाख, सभापती काशिनाथ दाते, सभापती उमेश परहर, सभापती मिराताई शेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, तसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.
----------
हिरक महोत्सवाचा ही शुभारंभ
याच कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद स्थापनेस ६० वर्षे पूर्ण झाल्याने जिल्हा परिषद हिरक महोत्सवाचा शुभारंभ, तसेच ग्रामीण विकास यंत्रणेच्या राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्वयंसहायता गट उत्पादनांच्या ॲानलाईन शाॅपिंगसाठी साईज्योती ई मार्केट प्लेसचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.