शिर्डीत स्कायवॉक
By मिलिंदकुमार साळवे | Updated: September 1, 2017 22:22 IST2017-09-01T22:16:08+5:302017-09-01T22:22:02+5:30
नगर-मनमाड महामार्गावरून चालताना शिर्डीत साईभक्तांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरुन चालावे लागते. पण आता साईभक्तांना मंदिरातून निघून रस्त्यांवरील वाहतूक व वाहनांचा सामना न करता थेट सुरक्षितपणे प्रसादालयात पोहचता येणार आहे.

शिर्डीत स्कायवॉक
अहमदनगर : नगर-मनमाड महामार्गावरून चालताना शिर्डीत साईभक्तांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरुन चालावे लागते. पण आता साईभक्तांना मंदिरातून निघून रस्त्यांवरील वाहतूक व वाहनांचा सामना न करता थेट सुरक्षितपणे प्रसादालयात पोहचता येणार आहे.
शिर्डी शहरातून जाणा-या नगर-मनमाड या एकमेव रस्त्यावरूनच सध्या साईभक्तांना शिर्डीत ये जा करावी लागते. या रस्त्यावर साईभक्तांसह लहान मोठ्या वाहनांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या रस्त्यावर अपघातही होतात. हा रस्ता ओलांडूनच साईभक्तांना जुन्या प्रसादालयात जेवणासाठी जावे लागते. साईभक्तांची विविध महोत्सवानिमित्त होणारी गर्दी तसेच आगामी साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त देश-विदेशातून येणा-या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता भक्तांना प्रसादालयात जाण्यासाठी शिर्डीत स्कायवॉक (पादचारी पूल) करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावानुसार राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने साईबाबा संस्थानच्या तिजोरीतून १ कोटी ३ लाख १९ हजार ९०२ रूपये खर्च करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
या मंजुरीमुळे साईबाबा मंदिर परिसराच्या १ क्रमांकाच्या प्रवेशद्वारापासून थेट जुन्या प्रसादालयात साईभक्तांना हवेतील पादचारी पुलावरुन जाता येणार आहे. याबाबतचा अंदाजपत्रकाची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच तपासणी करुन ते तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे. शिर्डी नगरपंचाजत व स्थानिक प्रशासकीय यंत्रणांची परवानगी मिळताच या स्काय वॉकच्या कामास सुरूवात करण्याचा संस्थानचा मार्ग मोकळा झाला आहे. स्कायवॉकमुळे शिर्डीतील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाने २५ फेब्रुवारी २०१७ रोजी हा स्काय वॉक बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी राज्याच्या विधी व न्याय खात्याकडे पाठविला होता. त्यास ३१ आॅगस्टला मान्यता देण्यात आली आहे.